प्रतिनिधी : नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या लेखणीतून साकारलेला ‘संघातील मानवी व्यवस्थापन’ हा प्रेरणादायी ग्रंथ नागपूरमध्ये प्रकाशित झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षांच्या पार्श्वभूमीवर आलेला हा ग्रंथ संघाच्या कार्यपद्धती, मूल्यव्यवस्था आणि माणूस घडवण्याच्या प्रक्रियेचे अत्यंत प्रभावी चित्रण करतो.
गडकरीजींनी संघाच्या अनुभवातून साकारलेला हा ग्रंथ केवळ व्यवस्थापनशास्त्राचे पुस्तक नसून, भारतीय मूल्यप्रणालीचा सार आहे. ‘शाखा: मूलस्थान व बलस्थान’, ‘कुशल संघटक’, ‘तीनदा बंदी आली तरी अजिंक्य’ यांसारख्या प्रकरणांतून संघातील शिस्त, नेतृत्व आणि आत्मसमर्पणाचे पैलू उलगडले आहेत.
राजहंस प्रकाशनातून आलेल्या या १५१ पानी ग्रंथाची प्रस्तावना विवेक घळसासी यांनी केली असून, लेखनाला शैलेश पांडे यांची साथ लाभली आहे. हा ग्रंथ स्वयंसेवकांसाठी मार्गदर्शक, प्रशिक्षणार्थींसाठी पाठ्यपुस्तक आणि सर्व वाचकांसाठी चिंतनप्रवृत्त करणारा ठरतो.