तळमावले/वार्ताहर : पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील अधिक तानाजी डाकवे याने इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटटस् ऑफ इंडियाने (आयसीएआय) मे 2025 मध्ये घेतलेल्या सीए (सनदी लेखपाल) परीक्षेत उज्ज्वल यश मिळवले आहे. जिद्द, चिकाटी आणि योग्य प्रयत्न असतील तर अशक्य गोष्टी देखील शक्य होतात हे त्याने दाखवून दिले आहे. अतिशय खडतर मानल्या जाणाऱ्या परीक्षेत त्याने यश मिळवत डाकेवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या यशामुळे त्याच्या कुटूंबियांसह संपूर्ण डाकेवाडीकरांची छाती अभिमानाने फुगली आहे.
प्रतिकूलतेवर मात करत कोणताही क्लास न लावता त्याने स्वंय अध्ययनाच्या जोरावर सीए परीक्षेत यश मिळवले आहे. न समजत्या वयात वडिलांचे आधाराचे छत्र अधिकच्या डोक्यावरुन हरपले. मायेचा, धीराचा हात हरपला. परंतू खचून न जाता एका जिद्दीने, एक निश्चित ध्येय डोळयासमोर ठेवून अधिकने आपली वाटचाल केली. आपल्या आईला आधार देत कुटूंब प्रमुखाची भूमिका सांभाळली आणि खऱ्या अर्थाने कुटूंबाला शिक्षित केले.
अधिकचे प्राथमिक शिक्षण जि.प.डाकेवाडी, माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल काळगांव येथे झाले. 11 वी व 12 वीचे शिक्षण मुंबई भांडूप (पश्चिम) येथील बॅरिस्टर नाथ पै विद्यालय ज्युनिअर काॅलेज मध्ये झाले. ज्युनिअरमध्ये असताना महाविद्यालयात व्दितीय येत आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवली. यामध्ये इंग्रजी आणि अर्थशास्त्र विषयात विभागात अव्वल होता. 12 वी नंतर मुंबई विद्यापीठात प्रवेश घेवून बी.काॅम तर खाजगी कंपनीत काम करत एम.काॅम पूर्ण केले.
त्यानंतर सीए संदीप शहा यांच्या ऑफीसमध्ये नोकरीस सुरुवात केली. तिथे त्यांनी काम करत असताना खूप पाठींबा दिला. त्यांनी आर्थिक सहकार्य केले. तसेच परीक्षेच्या वेळी पगारी रजा दिली. त्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे अधिकने सीए इंटरमिडिएट साठी प्रयत्न केला आणि पहिल्यादांच यशस्वी झाला. काम करत असताना तो परीक्षा देत राहिला. जोपर्यंत सीए परीक्षा पास होत नाही तोर्यंत प्रयत्न करत राहिलो आणि अखेर आषाढी एकादशी अधिकचे सीए बनण्याचे स्वप्न साकार झाले.
या उज्ज्वल यशाबद्दल अधिक डाकवे याचे समस्त ग्रामस्थ मंडळ डाकेवाडी, ग्रामपंचायत डाकेवाडी, त्रिमुर्ती सार्वजनिक उत्सव मंडळ, शिवछत्रपती प्रतिष्ठान, स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट डाकेवाडी यांच्यासह सर्व स्तरांतून त्याचे कौतुक होत आहे.