सातारा(अजित जगताप) : सातारा जिल्ह्यामध्ये गेली पंधरा दिवस नॉन स्टॉप पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये भर पडली आहे. काही ठिकाणी वापसा नसला तरी पेरणी करण्यासाठी काही शेतकऱ्यांनी प्राधान्य दिल्यामुळे सध्या सातारा जिल्ह्यात ३२ टक्के पेरणी झाली आहे.
पाटण, जावळी, महाबळेश्वर, कराड या ठिकाणी भात व नाचणी , मका, इतर तृणधान्य उडीद, मूग, तूर, सूर्यफूल, कारळा यांचे पेरणी झालेली आहे. उर्वरित सातारा, कराड , कोरेगाव, खटाव, माण, फलटण, खंडाळा, वाई या ठिकाणी सोयाबीन, भुईमूग, वाघा घेवडा, चवळी, वाटणा ,ऊस लागण असे मिळून तीन लाख ९६ हजार ३९२ हेक्टर पैकी एक लाख १५ हजार ६४४ हेक्टर मध्ये सध्या पेरणी व लागवड झालेली आहे.
. खटाव, माण, फलटण, खंडाळा भागात बाजरी पेरणी झालेली आहे. टक्केवारी पाहिली तर सातारा जिल्ह्यातील तालुका निहाय सातारा १३ टक्के, जावळी १८ टक्के ,पाटण २५ टक्के, कराड ४० टक्के, कोरेगाव १५ टक्के, खटाव ४२ टक्के, माण ४९ टक्के ,फलटण ४० टक्के, खंडाळा २६ टक्के, वाई २४ टक्के व महाबळेश्वर १९ टक्के असे मिळून ३२ टक्के पेरणी झालेली आहे.
अवकाळी पावसामुळे उन्हाळी व खरीप हंगामा पूर्णपणे वाया गेल्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व कृषिमंत्री यांना निवेदनाद्वारे केली आहे.
. सातारा जिल्ह्यामध्ये पावसामुळे मुबलक प्रमाणात धरण, तळे, पाझर तलाव भरले आहेत. सार्वजनिक व खाजगी विहिरीला पाणी असल्यामुळे आता मका व उसाचे क्षेत्र वाढणार आहे. सध्या युरिया, डीएपी, एमओपी सुपर फॉस्फेट , संयुक्त खत साठा विक्रीसाठी उपलब्ध असून शेतकऱ्यांनी बी बियाणे व खते सज्ज ठेवलेले आहेत. अद्यापही काही ठिकाणी वापसा येत नसल्याने मागास पेरणीतून सुमारे २० ते २५ टक्के शेती उत्पन्नामध्ये घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाडीबीपी च्या वतीने देण्यात येणारे बी बियाणे हेक्टरी क्षेत्रामध्ये कमी मिळत असल्याची शेतकरी संघटनेचे राजू शेळके ,अर्जुन साळुंखे, महादेव डोंगरे यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे तोंडी तक्रार केली आहे. त्याची तातडीने कृषी अधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे. लेखी स्वरुपात तक्रार प्राप्त झाल्यास निश्चितच कारवाई करण्यात येणार असाही स्पष्ट केले आहे.
____________________________
फोटो — सातारा जिल्ह्यामध्ये पेरणी करत असताना शेतकरी व कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा करताना शेतकरी संघटनेचे पदाधिकारी (छाया – निनाद जगताप सातारा)