
प


्रतिनिधी : धारावीतील खांबदेव नगरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यंदा या मंदिराचा ५६ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला असून, यानिमित्ताने दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
या विशेष दिवशी
राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते योगेश चिकटगावकर यांच्या “पिंगळा महाद्वारी” या भक्तिपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच
संतोष लिंबोरे निर्मित स्वर साक्षी प्रतिष्ठान आयोजित “हरिनामाचा गजर” या कार्यक्रमाने उपस्थितांची मनं जिंकली.
कार्यक्रमासाठी धारावीच्या आमदार डॉ. ज्योतीताई गायकवाड, शिवसेना विभाग संघटक विठ्ठल पवार, माजी नगरसेवक वसंत नकाशे, शाखाप्रमुख सतीश कटके, किरण काळे, आनंद भोसले, दीपक काळे, तसेच धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजू बिटकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी मंदिराला भेट दिली.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष संजय धुमाळ व त्यांच्या समितीतील सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रमाची तयारी केली. या सोहळ्यादरम्यान विठ्ठल रुक्मिणी हाउसिंग सोसायटीमधील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार डॉ. गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला.
संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हालेला होता आणि एकादशीनिमित्त शेकडो भाविकांनी मंदिरात हजेरी लावून विठूमाऊलीचे दर्शन घेतले. या कार्यक्रमांमुळे खांबदेव नगरमधील विठ्ठल भक्तांचा उत्साह अधिक वाढला.