Saturday, August 30, 2025
घरमहाराष्ट्रसाताऱ्यातही विठ्ठल.. विठ्ठल.. विठ्ठला.. मराठीच आमची विठ्ठला... गजर

साताऱ्यातही विठ्ठल.. विठ्ठल.. विठ्ठला.. मराठीच आमची विठ्ठला… गजर

सातारा(अजित जगताप ) : आज आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या चरणी आपले तन-मन-धन अर्पण करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी माणूस एकवटलेला आहे. काल मुंबईतील वरळीला मराठीचा बाणा दाखवण्यात आला. आज साताऱ्यात विठ्ठल.. विठ्ठल.. विठ्ठला… मराठीच आमची विठ्ठलाचा गजर सर्वत्र ऐकू येऊ लागला.
सातारा जिल्ह्यातील करहर ता. जावळी, कोरेगाव, शिरवळ, तापोळा, उंब्रज, ढेबेवाडी तसेच विविध अंगणवाडी, शाळा, बालवाडी मध्ये बाल गोपाळांनी माऊलीच्या रुपात दिंडी सोहळा साजरा केला. हरिपाठ, अभंग, गायन, भजन- कीर्तन त्याचबरोबर टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि विठ्ठल.. विठ्ठल.. विठ्ठला.. मराठी आमची विठ्ठला अशी साथ दिली. राजकीय पादुका बाहेर ठेवून अनेकांनी मराठीचा गजर केला. वारकऱ्यांनी व तरुणाईने एकमेकांच्या सोबत फुगडीचा फेरा धरला. मराठी मायबोलीच्या वातावरणात विठ्ठल नामाची शाळा भरली. असं नयनरम्य दृश्य सातारा जिल्ह्यात सर्वत्र दिसून आले.
ह. भ. प. दत्तात्रय महाराज कळंबे यांच्या कृपेने व आशीर्वादाने जावळी तालुक्यातील करहर परिसरात दीडशे वर्षांपूर्वी बहिर्जीनाथ यांनी सुरू केलेली आषाढी सोहळा आणि मराठी भाषेची ज्योत तेवत ठेवली आहे. त्याचे अनेकांनी स्मरण करून अनेक दिंड्यांनी खऱ्या अर्थाने मराठीपण जपले आहे.
काल मुंबईतील वरळी येथे झालेल्या मनसे व शिवसेना, महाविकास आघाडी या दोन पक्षाच्या पुढाकाराने झालेल्या या मेळाव्याला सर्वच मराठी समाजासाठी कार्यरत असणाऱ्या संघटना तसेच राजकीय पक्षाच्या कार्यकर्ते व नेत्यांची उपस्थिती लक्षणीय होती. करहर येथील अध्यात्मिक अधिष्ठान लाभलेल्या या पवित्र तीर्थक्षेत्राला क दर्जा मिळवण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा यंदा मिळाल्यामुळे वारकऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण झाल्याचे दिसले.
साताऱ्यातील पाटण, पुसेगाव, कुसुंबी करहर, केळघर, मेढा ,भुईंज, पिलीव ,गोंदवले, वडूज, रहिमतपूर, वाई, खंडाळा, फलटण, कराड पुसेसावळी, कोरेगाव, अपशिंगे, सायगाव, रायगाव, सातारा शहर, नागेवाडी, पाचवड, उडतारे, शाहूपुरी, आनेवाडी, पवारवाडी आधी भागातही मोठ्या प्रमाणात अभंग किर्तन व वारकरी संप्रदायाच्या मराठी बाणा दाखवून देण्यात आला. खऱ्या अर्थाने आषाढी एकादशी ही मराठी माणसांच्या एकजुटीचे दर्शन देणारी ठरली आहे. असे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सक्रिय सहभाग घेणारे ९३ वर्षाचे महिगाव ता. जावळीतील जुने जाणते कार्यकर्ते ह. भ. प. शामराव पवार यांनी सांगितले.

_________________________
फोटो — करहर तालुका जावळी या ठिकाणी माऊलीचे दर्शन घेताना भाविक व विठ्ठल.. विठ्ठल.. विठ्ठला. मराठी आमची विठ्ठला गजर करताना (छाया – मयांक नामदास, सातारा)

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments