प्रतिनिधी : विजयी मेळाव्याच्या मंचावर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली. “पुढे काय होईल सांगता येत नाही, पण ही मराठीची एकजूट अशीच कायम राहावी,” अशी भावना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
“बाळासाहेबांचं स्वप्न पुन्हा साकार व्हावं, हीच इच्छा आहे,” असंही त्यांनी भाषणाच्या शेवटी सांगितलं.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, “आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी. भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं हेच अधिक महत्त्वाचं आहे,” असे मत व्यक्त केले.
ठाकरे बंधूंनी एकमेकांबद्दल सकारात्मक भाष्य केल्याने आणि एकत्र येण्याची जाहीर घोषणा केल्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
या मेळाव्यामुळे ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची सुरुवात झाली का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.