Sunday, July 6, 2025
घरमहाराष्ट्रअभीष्टचिंतन..... ...

अभीष्टचिंतन….. कृतज्ञतेचा महामेरू : श्री प्रल्हाद वामनराव पै

तुम्ही आनंद वाटता की दुःख
हे तुम्हीच ठरवायचे असते,
लक्षात ठेवा जीवनविद्या
ही जगायची असते…….

यूट्यूबवर प्रसिद्ध असलेले हे गीत म्हणजे श्री. प्रल्हाद वामनराव पै यांच्या सखोल चिंतनातून स्फुरलेली गुरुकिल्ली आहे. किंबहुना ‘कृतज्ञता मनात भरभराट जीवनात’ हा जीवनमंत्र कसा जपायचा ते शिकवितात.
केवळ त्यापुरतेच मर्यादित न राहता जीवन युक्तीने कसे जगायचे याचे उत्तम मार्गदर्शन श्री. प्रल्हाददादा गेली अनेक वर्षे करीत आहेत .
मानवी जीवनात कृतज्ञतेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. परंतु पावलोपावली कृतज्ञतेने स्मरण कसे करावे याचे संशोधनात्मक तात्विक विश्लेषण श्री. प्रल्हाददादा करतात. यामुळेच ते ‘कृतज्ञतेचा महामेरू’आहेत. आपले जीवन उत्तम रीतीने जगण्यासाठी, जीवनात यशस्वी होण्यासाठी किंवा आपल्या जीवनात येणाऱ्या विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अनेक महान विचारवंतांचे सखोल मार्गदर्शन आपण घेत असतो. बऱ्याचदा असे आढळते की हे मार्गदर्शन ऐकायला बरे वाटते परंतु प्रत्यक्षात अवलंब करतांना मात्र ते थोडेसे अवघड होते. याचे कारण असे की त्यातील युक्तीयोग सर्वांना समजतोच असे नाही. आता हा युक्तीयोग म्हणजे नेमके काय हे समजण्यासाठी अर्थातच सद्गुरु श्री वामनराव पै यांनी निर्माण केलेले जीवनविद्या तत्वज्ञान अभ्यासणे जरुरी आहे. सत्तर वर्षांहून अधिक कालावधी जीवनविद्या तत्वज्ञान केवळ भारतातच नव्हे तर जगभरात स्वीकारले जात आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे जीवनविद्या हे केवळ अध्यात्मशास्त्र नसून ती जीवन जगण्याची कला आहे. जगाच्या पाठीवर हे एकमेव शास्त्र असे आहे की ज्यामध्ये यशस्वी जीवन सुखी जीवन जगतांना परमार्थ सुद्धा साधणे शक्य आहे. सद्गुरु श्री वामनराव पै यांनी सखोल चिंतन, अभ्यास करून दिव्य साधनेतून जीवनविद्या तत्वज्ञानाची निर्मिती केली.
बुडती हे जन न देखवे डोळा ll
हिताचा कळवळा येतो त्यांच्या ll
संतांच्या वरील उक्तीचा प्रत्यक्ष अनुभव सद्गुरु श्री वामनराव पै यांनी घेतला आणि सर्वसामान्य माणसाला मनःस्थिती बदलून परिस्थिती बदलण्याचा, सुखी जीवन जगण्याचा राजमार्ग दाखविला. भारताचे हे अहोभाग्य आहे की असे अनमोल तत्त्वज्ञान निर्माण करणारे थोर विचारवंत आपल्या देशात आहेत. किंबहुना प्रत्येक मराठी माणसाचा सद्गुरु श्री वामनराव पै हे अभिमान आहेत. आजवर लाखो लोकांनी या तत्त्वज्ञानाचा लाभ घेतला. त्यांच्या जीवनामध्ये क्रांती घडवून आणली. सद्गुरूंनी वयाच्या 89 वर्षांपर्यंत प्रवचनांच्या माध्यमातून सातत्याने जीवनविद्या तत्त्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे 1952 साली लावलेले इवलेसे रोप, आता त्याचा वेलू गगनावरी गेला आहे. 2012 साली सद्गुरुंचे महानिर्वाण झाले. परंतु त्यानंतर श्री. प्रल्हाद वामनराव पै यांनी जीवनविद्येची धुरा समर्थपणे सांभाळली आहे. आज मितीला अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दुबई, जर्मनी अशा विविध देशांमध्ये श्री. प्रल्हाददादा अनमोल मार्गदर्शन करीत आहेत.

श्री. प्रल्हाद वामनराव पै यांची ओळख सांगायची झाली तर ते उच्च विद्याविभूषित आहेत. मुंबई आयआयटी पवई येथून त्यांनी बी टेक चे शिक्षण पूर्ण केले तसेच जमनालाल बजाज या प्रतिष्ठित संस्थेमधून मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे. त्याचबरोबर जपान येथून टोटल क्वॉलिटी मॅनेज मॅनेजमेंट देखील पूर्ण केले आहे. गेली अनेक वर्ष ते कॉर्पोरेट सेक्टर मधून उच्च पदांवर कार्यरत राहून निवृत्त झाले आहेत. परंतु हे करीत असतांना त्यांनी जीवनविद्येचे तत्वज्ञान सद्गुरुंकडून आत्मसात केले. अत्यंत बुद्धिमान असल्यामुळे तसेच त्यांना त्यांच्या प्रमाणेच हुशार असलेल्या सुविद्य, प्रेमळ पत्नी मिलनताई यांची समर्थ साथ लाभल्याने गेल्या काही वर्षांत जीवनविद्येचे तत्वज्ञान अनेक लोकांपर्यंत पोहोचविण्यात अपार कष्ट घेतले आहेत.
सद्गुरुंकडून जीवनविद्या तत्त्वज्ञान आत्मसात करीत असतांना श्री. प्रल्हाददादा यांनी हे तत्त्वज्ञान रोजच्या जीवनामध्ये युक्तीने कसे वापरता येईल याचे सखोल चिंतन केले. त्याचा फायदा विविध लोकांना ते त्यांच्या जीवनात, प्रपंचामध्ये, कार्यक्षेत्रामध्ये, परमार्थामध्ये कसे वापरायचे हे कळले. अर्थातच त्यांचे जीवन यशस्वी झाले. एक अनुभव सांगावासा वाटतो. कॅनडामध्ये वास्तव्यास असतांना एक भारतीय डॉक्टर शिल्पा लाड यांच्या कामाने प्रभावीत झालेल्या एक कॅनेडियन डॉक्टर जीन सिलि तेथील युनिव्हर्सिटीच्या डीन चक्क जीवनविद्या तत्वज्ञान शिकण्यासाठी भारतात आल्या. त्यांनी जीवनविद्या मिशनच्या कर्जत येथील ज्ञानपीठाला भेट देऊन तत्त्वज्ञान शिकून घेतले. इतकेच नव्हे तर सद्गुरुंचा अनुग्रह देखील स्वीकारला. डॉक्टर जीन सिली यांनी कॅनडा मध्ये श्री. प्रल्हाददादा यांना मार्गदर्शनासाठी आमंत्रित केले. तेथील स्टाफसाठी त्यांचे मार्गदर्शन आयोजित केले. असे कितीतरी मान्यवर, उच्चविद्याविभूषित लोक श्री. प्रल्हाददादांच्या मार्गदर्शनाने प्रभावित होत आहेत. याचे कारण श्री. प्रल्हाददादा अत्यंत सुलभ रीतीने, सोप्या भाषेत समृद्ध जीवन जगण्याचे ज्ञान देतात.
श्री. प्रल्हाद वामनराव पै यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी आहे. त्यामुळे त्यांनी केलेले कार्य देखील सर्वसमावेशक आहे. परमार्थातील ‘सच्चिदानंद स्वरूप’ हा कठीण विषय सर्वांत सोपा करून श्रोत्यांना उपयुक्त ठरेल अशा प्रकारे ते सांगतात.
गेली अनेक वर्षे संपूर्ण महाराष्ट्रात विविध कोर्स फॅकल्टीज तयार करून त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कोर्स हा उपक्रम यशस्वी रीतीने राबविला आहे. आजवर अनेक विद्यार्थ्यांनी या कोर्समुळे सुंदर रीतीने आपले जीवन घडविले आहे. श्री. प्रल्हाददादांनी प्रत्येक जीवाला आईच्या गर्भात असल्यापासूनच जीवनविद्येचे तत्वज्ञान मिळावे याकरिता गर्भसंस्कार कोर्सेसचे डिझाईन केले. त्याचे अनुभव नवजात बालकांचे पालक वेळोवेळी कथन करतात. अनेक लोक आज याचा लाभ घेत आहेत.

वृद्धापकाळात परमार्थाकडे माणसे अधिक वळलेली आपण नेहमीच पाहतो परंतु श्री. प्रल्हाददादा यांच्या आजूबाजूला पाहिल्यास असे लक्षात येते की जास्तीत जास्त तरुण मुले प्रभावित झालेली आहेत. याचे कारण म्हणजे श्री. प्रल्हाददादा युवकांच्या बुद्धीला पटणारे, रुचणारे विचार देतात. त्यांना कोणत्याही कर्मकांडात अडकवून ठेवत नाहीत. या उलट विवेक आणि विज्ञान यांची जोड करून विकास कसा साधता येईल यासाठी युट्युब वरून ‘प्रल्हाद पै स्पीक्स’ नावाचे वेबिनार, पॉड कास्ट सुरू केले आहे.
श्री. प्रल्हाद पै एका मोठ्या कंपनीमध्ये व्यवस्थापक पदावर कार्यरत असतांना ते तेथील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमध्ये नव्हे तर त्या कंपनीमधील सर्व कामगारवर्गांमध्ये देखिल तितकेच लोकप्रिय होते. याचे कारण म्हणजे त्यांना बालपणापासून मिळालेले जीवनविद्येचे बाळकडू हे होय. एकदा एका मोठ्या हॉस्पिटलला आंतरराष्ट्रीय नामांकन मिळविण्याच्या प्रक्रियेत त्यांनी सौहार्दपूर्ण मार्गदर्शन केले आणि कायदेशीर रीतीने ते नामांकन त्यांना मिळवून दिले. त्यांच्या याच व्यावसायिक अनुभवाच्या शिदोरीतून तसेच जीवनविद्येचे शहाणपण जोडून विविध अंगी मार्गदर्शन सातत्याने करीत आहेत. हे मार्गदर्शन इतके उपयुक्त ठरत आहे की अनेक मुले त्यांच्या त्यांच्या कॉर्पोरेट क्षेत्रात यशस्वी होत आहेत. आपल्या देशात उच्चशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत परंतु ते ज्ञान योग्य रीतीने वापरून यशस्वी होण्याची युक्ती केवळ श्री. प्रल्हाद पै देऊ शकतात. त्यामुळे श्री प्रल्हाददादा ‘युथ मेन्टॉर’ म्हणून प्रसिद्ध आहेत. असे मार्गदर्शन जर प्रत्येकाने घेतले तर आपला देश नक्कीच महाशक्तिशाली होईल यात शंका नाही.
वर उल्लेख केल्याप्रमाणे श्री. प्रल्हाददादा हे प्रपंचाच्या अंगाने देखिल अप्रतिम मार्गदर्शन करीत असतात. त्यांच्याकडे समुपदेशनासाठी अनेक तरुण मुले, जोडपी, आई वडील मुलांच्या संदर्भात भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करवून घेण्यासाठी येत असतात. अर्थातच श्री. प्रल्हाददादा अत्यंत दयाळूपणे मार्गदर्शन करीत राहतात. परंतु या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट सांगाविशी वाटते, जर युट्युब वर असलेल्या सद्गुरु श्री वामनराव पै आणि श्री प्रल्हाददादा यांच्या विविध प्रवचनांचे, व्याख्यानांचे व्हिडिओ नीट पाहिले, ऐकले, त्यावर चिंतन केले, त्यानुसार आचरण केले तर कठीण परिस्थिती वाट्याला येणारच नाही. जरी आलीच तरी त्यातून सुखरूपपणे बाहेर पडता येईल याची शाश्वती निश्चित देता येते.

आजच्या घडीला खऱ्या सद्गुरूंची वानवा असलेली आढळते.
खरे सद्गुरु हे निरपेक्ष असतात, आत्मज्ञानी असतात, साधकांच्या हिताचा त्यांना कळवळा असतो आणि त्यासाठी ते स्वतःचा देह चंदनाप्रमाणे झिजवितात. हे सर्व गुण असून देखील श्री. प्रल्हाददादा स्वतःला सद्गुरु म्हणवून घेत नाहीत, किंबहुना साधकांनी हे करू नये असे नम्रपणे सांगतात. उच्च शिक्षण, अत्यंत विद्वान, एक यशस्वी पुत्र, प्रेमळ पती, कुटुंबवत्सल पिता, लाडके आजोबा आणि सर्व नामधारकांचे आनंदनिदान श्री. प्रल्हाद वामनराव पै यावर्षी 8 जुलै रोजी वयाची 75 वर्षे पूर्ण करीत आहेत. सर्वांचे जीवन सुखी, समृद्ध, यशस्वी व्हावे याकरिता ते सदैव साधना करतात. याचे चिंतन ते क्षणोक्षणी करीत असतात. श्री प्रल्हाददादांच्या कल्पक बुद्धीतून नेहमीच उत्तम कार्य घडत असते. उदाहरणादाखल घरोघरी सुरु असणारे विश्वप्रार्थना जप यज्ञ हे होय. अजून एक समाजउपयुक्त कार्य म्हणजे जीवनविद्या ॲप. या ॲपद्वारे आपले जीवन सर्वांगाने सुखी समृद्ध करण्याची खात्री नक्कीच देता येते. हे ॲप श्री. प्रल्हाददादा समाजाला समर्पित करतात. कारण ‘प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची विश्वशांतीची’ असे त्यांचे घोषवाक्य आहे. जीवनविद्या तत्त्वज्ञान शिकवितांना श्री. प्रल्हाददादा यांनी कृतज्ञतेचे खूप सुंदर मार्गदर्शन सातत्याने केले आहे. कृतज्ञता केवळ शब्दांतून व्यक्त न करता आपल्या कृतीमधून कशी व्यक्त करावी, याची सुंदर युक्ती ते नेहमी देत असतात. विविध लोकांनी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या युक्त्या शिकून घेतल्या आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, यश, भरभराट, चांगले आरोग्य, सर्व चांगल्या गोष्टी आकर्षित होत आहेत. श्री दादांनी शिकविलेल्या कृतज्ञतेच्या युक्तीने अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या सोहम सुखटणकर या भारतीय मुलाने तेथील ‘स्पेलिंग बी’ नावाची प्रसिद्ध स्पर्धा जिंकली असे तो नम्रपणे सांगतो. कृतज्ञतेच्या विविध युक्त्या शिकून अनेक युवकांनी स्वतःची प्रगती साधली आहे, चांगली नोकरी मिळविली. तर काहींनी व्यवसायात उत्तम प्रगती केली आहे. याचे विविध अनुभव श्री प्रल्हाददादांच्या कॉन्फरन्स कॉलमध्ये नेहमीच ऐकायला मिळतात. इतकेच नव्हे तर ही कृतज्ञता घरातील, घराबाहेरील विविध लोकांना जोडण्यासाठी, कौटुंबिक सौख्य टिकविण्यासाठी, मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी उपयुक्त आहे. त्याचे मार्गदर्शन प्रल्हाददादा नेहमी करीत असतात.
श्री. प्रल्हाददादा नेहमीच सुहास्य वदनाने सर्वांचे स्वागत करीत असतात. अगदी कोणी प्रथमतः भेटीस आले तरी आपुलकीने त्यांना वागवितात. कारण त्यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ आहे. ते अतिशय नम्र असून साधेपणाने राहतात. जीवनविद्या मिशन परिवारातील प्रत्येक व्यक्तीला त्यांनी प्रेमाने जोडले आहे. त्यामुळे आज लाखो नामधारक त्यांनी दिलेले मार्गदर्शन अवलंब करण्याचा प्रयत्न करतात. श्री. प्रल्हाददादा यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. त्यांना उदंड आयुष्य चांगले आरोग्य लाभावे. हे राष्ट्र सर्वार्थाने पुढे जाण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाचा उपयोग व्हावा. तसेच हे जग सुखी व्हावे हा सद्गुरु श्री वामनराव पै यांचा संकल्प सिद्ध व्हावा हीच सद्गुरू चरणी प्रार्थना.
आणि सर्वांना जीवनविद्या जगण्याचे ज्ञान लाभू दे.
श्री. प्रल्हाददादांच्याच शब्दात सांगायचे झाले तर.

आनंद वाटण्यासाठी
फार काही करायचे नसते,
एक सुंदर हास्य पण पुरुन उरते.
लक्षात ठेवा जीवनविद्या ही जगायची असते. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे ; सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव ; सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.

– प्रा. नयना रेगे, 9820451579 (naynarege8jvm.@gmail.com) (लेखिका महाविद्यालयात प्राध्यापिका आहेत)*

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments