प्रतिनिधी : महाराष्ट्राचे सुपुत्र आदरणीय न्यायमूर्ती श्री.भूषण रामकृष्ण गवई यांची भारताच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र विधानमंडळातर्फे सत्कार करण्यात येणार आहे. हा सत्कार सोहळा दिनांक 8 जुलै, 2025 रोजी दुपारी 2.00 वाजता, मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी घोषणा आज दिनांक 04 जुलै, 2025 रोजी विधानपरिषद सभागृहात सभापती प्रा. राम शिंदे यांनी तर विधानसभेत अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी केली.
सत्कार सोहळ्यास व्यासपीठावर महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि श्री. अजित दादा पवार, विधानपरिषद उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष श्री. अण्णा बनसोडे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते श्री. अंबादास दानवे उपस्थित असतील. सर्व मंत्रीगण तसेच दोन्ही सभागृहांचे सन्माननीय सदस्य, विधि व न्यायक्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सत्कार सोहळ्याप्रसंगी आदरणीय सरन्यायाधीश श्री. भूषण रामकृष्ण गवई यांचे “भारताची राज्यघटना” या विषयावर संबोधन होईल.