मुंबई | प्रतिनिधी : देवनार डम्पिंग ग्राउंड आणि धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारवर टीका करणाऱ्या विरोधकांना माजी खासदार राहुल शेवाळे यांनी सडेतोड शब्दांत उत्तर दिलं आहे. “विरोधकांनी निदान सत्य जाणून घेण्याची तसदी तरी घ्यावी,” अशी स्पष्ट टोलेबाजी करत त्यांनी अपप्रचार करणाऱ्यांचा समाचार घेतला.
राहुल शेवाळे यांनी स्पष्ट केलं की, “देवनार डम्पिंग ग्राऊंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याची प्रक्रिया मुंबई महानगरपालिकेकडून गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. ही जागा राज्य सरकारची असून, पालिकेला ती भाडे तत्वावर देण्यात आली होती. आता ती राज्य सरकारकडे परत जात असताना, ती स्वच्छ करून परत देणं ही पालिकेची जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी पार पाडली जात आहे.”
“डम्पिंग ग्राउंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद झाल्यावर अतिक्रमण, प्रदूषण आणि बेकायदेशीर हालचालींना आळा बसेल. पण विरोधकांना हेच नको आहे का?” असा थेट सवाल करत, “त्यांना नेमकं कोणाचं हित साधायचं आहे?” असा प्रश्न त्यांनी मुंबईकरांसमोर उपस्थित केला आहे.
राहुल शेवाळे यांनी अधोरेखित केलं की, “डम्पिंग ग्राउंड पूर्णपणे बंद झाल्यावर आणि यंत्रणांची परवानगी मिळाल्यावरच पुनर्वसनाचा विचार केला जाईल, हे शासनाने स्पष्ट केलं आहे. तसेच, धारावी आणि इतर ठिकाणी दर्जेदार पायाभूत सुविधा उभारल्या जातील. यामुळे पालिकेचा मोठा आर्थिक फायदा होणार आहे.”
विरोधकांनी विनाकारण जनतेची दिशाभूल करू नये. सत्य मांडावं. पण जर हेतूपुरस्सर राजकारणच करायचं असेल, तर आम्ही दरवेळी त्यांचा असत्याचा बुरखा टराटरा फाडत राहू,” असा स्पष्ट इशारा राहुल शेवाळे यांनी दिला आहे