महाबळेश्वर प्रतिनिधी : संत रोहिदास समाज फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मौजे वाडा कुंभरोशी (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) येथे एक भव्य गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सातारा व रायगड जिल्ह्यातील चर्मकार समाजातील तसेच इतर समाजातील एकूण ७५ विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
यामध्ये डॉक्टर, वकील, अभियंते, नर्सिंग, एम/बी फार्मसी, यूपीएससी परीक्षार्थी तसेच दहावी-बारावी परीक्षांमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शालेय साहित्य देऊन सत्कार करण्यात आला. नुकतेच दहावीमध्ये प्रवेश केलेल्या २७ विद्यार्थ्यांचाही विशेष गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. भिकू कारंडे (पाटील, शिरणार) होते. यावेळी श्री. राजेंद्रशेठ राजुपुरे (संचालक, सातारा जिल्हा सहकारी बँक), प्रा. डॉ. नंदकिशोर चंदन (युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड, इंग्लंड), अॅड. सौ. सीमा शिंदे (मुंबई उच्च न्यायालय), श्री. प्रवीण भिलारे (जिल्हा नियोजन समिती सदस्य), श्री. सुनील पार्टे (विस्तार अधिकारी, पंचायत समिती महाबळेश्वर) हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रा. डॉ. चंदन यांनी विद्यार्थ्यांना प्रगतीचे छोटे-छोटे फॉर्मुले देत प्रेरणादायी संवाद साधला आणि सांगितले की, “मी तुमच्यासोबत आहे; असे कार्यक्रम पुन्हा पुन्हा घ्या.”
सौ. अॅडव्होकेट सीमा शिंदे यांनी विशेषत: ग्रामीण भागातील मुलांच्या चिकाटीचे कौतुक करत सांगितले की, “वाडी वस्तीतील मुले शहरातील विद्यार्थ्यांपेक्षा अधिक अभ्यासक्षम आणि मनोबलवान आहेत. अशा विद्यार्थ्यांना सतत दिशा देण्यासाठी मी पुन्हा-पुन्हा येईन.”
श्री. राजुपुरे यांनी आपल्या भाषणात ठामपणे सांगितले की, “चर्मकार समाजातील विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात यश मिळवत आहेत. त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.”या कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य करणारे संत रोहिदास समाज फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. संपत धोंडिबा कदम, उपाध्यक्ष श्री. पांडुरंग चिकणे, सचिव श्री. संजय कदम, खजिनदार श्री. प्रशांत कारंडे आणि संचालक मंडळातील श्री. सदाशिव कारंडे, श्री. चंदू कारंडे, संदीप तांबे, महेंद्र कारंडे, राजाराम कदम यांचे मोलाचे योगदान लाभले.
शाखा वाडा कुंभरोशीतील श्री. पांडुरंग नामाजी कारंडे, श्री. जनार्दन कदम, श्री. अजित, जितेंद्र, मंगेश, बाळू, पंकज, सचिन, संतोष, विकास आणि सुभाष कदम यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. संदीप मारुती कदम सर यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. जितेंद्र कारंडे यांनी सर्व मान्यवर, पाहुणे व उपस्थित समाजबांधवांचे मनःपूर्वक आभार मानले.
संत रोहिदास समाज फाऊंडेशनने करोना काळात किट वाटप, अतिवृष्टीग्रस्तांना मदत, गरीब कुटुंबांना वैद्यकीय आणि शैक्षणिक सहाय्य अशा विविध समाजोपयोगी उपक्रमांतून आपले योगदान देत समाजहिताचे कार्य सुरू ठेवले आहे.
हा गौरव सोहळा केवळ सन्मान नव्हता, तर नव्या पिढीला प्रेरणा देणारा दीपस्तंभ ठरला.