भारत सरकारच्या मुंबई दूरदर्शन केंद्रात निर्माता, महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात संचालक म्हणून आणि सेवानिवृत्तीनंतर आता न्यूज स्टोरी टुडे पोर्टलचे संपादक म्हणून अशी ४० वर्ष प्रसार माध्यमात सक्रिय असलेले, मुळचे विदर्भातील अकोला येथील असलेले देवेंद्र भुजबळ यांचा जन्म ४ जुलै १९६० रोजी संगमनेर येथे;आजोळी झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा लेखप्रपंच.
देवेंद्र भुजबळ यांनी आर्थिकदृष्ट्या आकर्षक असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्या सोडून विचारपूर्वक माध्यम क्षेत्र निवडले.नगर येथील दैनिक समाचारमध्ये उपसंपादक कम वार्ताहर, पुणे येथील दैनिक केसरी मध्ये उपसंपादक, साप्ताहिक सह्याद्रीमध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केले.
दूरदर्शनच्या सहा वर्षांच्या सेवा काळात भुजबळ यांनी अनेक कार्यक्रम,माहितीपट,दूरदर्शन वृत्तांत निर्माण केले.अनेक कार्यक्रमांच्या निर्मितीत योगदान दिले .संहिता लेखन केले.काही कार्यक्रमात सहभाग घेतला . पुढे दूरदर्शन सोडून महाराष्ट्र शासनाच्या सेवेत आल्यावर त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या दूरदर्शनवरील “शिवशाही आपल्या दारी” या २४ भागांच्या मालिकेच्या, सोमवार ते शुक्रवार अशा दीड वर्षे प्रसारित झालेल्या “माय मराठी” कार्यक्रमाच्या, तसेच मराठवाडा विद्यापीठ नामांतर प्रसंगी योग्य वातावरण निर्मिती करण्यासाठी दूरदर्शनवर चालविल्या गेलेल्या मोहिमेच्या निर्मिती आणि प्रसारणात समन्वयक अधिकारी म्हणून महत्वाची भूमिका बजावली.
दूरदर्शनच्या गाजलेल्या “महाचर्चा” कार्यक्रमाचे ते ४ वर्षे रिसर्च अँड रिसोर्स पर्सन होते. आकाशवाणी वरील महाराष्ट्र शासनाच्या “दिलखुलास” कार्यक्रमाच्या पहिल्या ५०० भागांचे ते टीमलीडर होते. आकाशवाणीच्या काही कार्यक्रमांमध्ये देखील त्यांनी सहभाग घेतला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महान्यूज वेबपोर्टलसाठी ‘करिअरनामा’ हे सदर भुजबळ यांनी सुरू केले . या सदरासाठी ते स्वतः नियमित लेखन करीत असत. त्यांचे हे लेख विविध वृत्तपत्रातूनही प्रसिद्ध होत.
ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे झालेल्या चौथ्या विश्व सावरकर साहित्य संमेलनात भुजबळ यांचे “स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता” या विषयावर झालेले व्याख्यान विशेष गाजले. मलेशियातील चौथ्या विश्व शब्द साहित्य संमेलनाचे ते उद्घाटक होते.या बरोबरच त्यांची विविध ठिकाणी संवाद सत्रे झाली आहेत.दोन वर्षांपूर्वी अमेरिकेत असताना,त्यांचे शिकागो मराठी मंडळाने “स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता ” या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.
देवेंद्र भुजबळ हे विविध विषयांवर सातत्याने लिहीत असतात.तसेच विविध विषयांवर व्याख्याने देखील देत असतात. “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरक पत्रकारिता ” हा त्यांचा संशोधनपर लेख मराठी बरोबरच हिंदी, इंग्रजी, गुजराती, ऊर्दू भाषेतही प्रसिद्ध झाला आहे . साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक नाट्य, चित्रपट , दूरदर्शन, प्रसार माध्यमे यात देवेंद्र भुजबळ सतत कार्यरत असतात. समाजातील दुर्बल घटकांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांसाठीही ते काम करत असतात. गणित आणि विज्ञान विषयांची नावड त्यात बिकट कौटुंबिक परिस्थितीमुळे दहावीत नापास झाल्यामुळे त्यांना दोन वर्षे शिक्षणापासून दूर रहावे लागले . पुढे पडेल ते काम करत ते शिकले.देवेंद्र भुजबळ हे पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रा. एल. एन. गोखले पाठ्यवृत्तीचे सर्व प्रथम मानकरी ठरले. तर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या विभागाच्या मास्टर्स पदवीत ते प्रथम श्रेणीत सर्व प्रथम आले. भारत सरकारच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन,महाराष्ट्र शासनाच्या यशदा या संस्थांचे माध्यम अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी त्यांना त्या त्या सरकारांच्या नोकरीत असताना मिळाली.
भुजबळ यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार, मान सन्मान मिळाले आहेत. नुकताच त्यांना मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे इंडिया टुडे वृत्तवाहिनीचे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई यांच्या हस्ते त्यांना सभासदत्व बहाल करण्याचा सन्मान झाला.
भुजबळ यांची आता पर्यंत
भावलेली व्यक्तिमत्वे, गगनभरारी, प्रेरणेचे प्रवासी, स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता, करिअरच्या नव्या दिशा, अभिमानाची लेणी, समाजभूषण,आम्ही अधिकारी झालो ,ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. शासकीय सेवेत असताना, शासनाच्या विविध प्रकाशनांचे त्यांनी संपादन केले आहे. तर निवृत्ती नंतर न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्स साठी “जीवनप्रवास”
“समाजभूषण २” “मी,पोलीस अधिकारी” “पौर्णिमानंद” :(काव्य संग्रह) “अजिंक्यवीर ” “अंधारयात्रीचे स्वप्न” “चंद्रकला” कादंबरी,
“हुंदके सामाजिक वेदनेचे” “मी शिल्पा, सत्तरीतील सेल्फी या पुस्तकांचे संपादन केले आहे.
त्यांची “नर्मदा परिक्रमा ” “मी वाचलेली पुस्तके ” “अमेरिका अमेरिका” “माहिती”तील आठवणी”, “बाबासाहेब आणि आम्ही” ही आगामी प्रकाशने आहेत.
देवेंद्र भुजबळ यांना त्यांच्या या प्रसार माध्यमाच्या कार्यात त्यांच्या पत्नी सौ. अलका भुजबळ या चांगल्या सहकार्य करतात. त्यांचे “कॉमा ” हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार असून या पुस्तकामध्ये त्यांनी कॅन्सरवर यशस्वीरित्या मात केल्याचे प्रेरणादायी अनुभव कथन केले आहे. नवी मुंबई सानपाडा येथील मिलेनियम टॉवर मध्ये राहणारे देवेंद्र भुजबळ व सौ अलका भुजबळ ही जोडी न्यूज स्टोरी टुडे पोर्टल या प्रसार माध्यमातून अनेकांचे सामाजिक कार्य प्रसिद्धी झोतात आणीत आहेत. देवेंद्र भुजबळ व सौ. अलका भुजबळ या दाम्पत्याच्या सामाजिक कार्याला सलाम.
_मारुती विश्वासराव
नवी मुंबई.
9869020858