मुंबई : “आज पत्रकारितेवर अनेक प्रकारचे दबाव आहेत. पण पत्रकारितेचं बळ टिकवायचं असेल, तर सत्यशोधन आणि प्रश्न विचारण्याचं धाडस टिकवलं पाहिजे,” असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार यांनी व्यक्त केले. ‘अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदे’च्या वतीने आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार एस.एम. जोशी होते. मंचावर डॉ. नरेंद्र जाधव, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस दीपक केतके, मुंबई विभागीय अध्यक्ष राजा आदाटे यांच्यासह विविध पत्रकार परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.
या सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार श्री. मधुकर भावे यांना ‘बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार’, तर नाट्यकर्मी श्री. भरत जाधव यांना ‘विशेष सन्मान’ देण्यात आला. तसेच महेश म्हात्रे, अभिजित करांडे, अमेय तिरोडकर, पांडुरंग पाटील, सर्वोत्तम गावस्कर, दिनेश केळुसकर, सीमा मराठे, बाळासाहेब पाटील, शर्मिला कलगुटकर व भरत निगडे यांनाही विविध सन्मान देण्यात आले.
शरद पवार म्हणाले :
“स्वातंत्र्यानंतर माध्यमांनी जनतेचा आवाज बनण्याचं काम केलं. आज मात्र मालकीचे स्वरूप बदलल्यामुळे संपादकीय स्वातंत्र्यावर गदा येऊ लागली आहे. अशा वेळी निर्भीड पत्रकारांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरते. पत्रकारांनी कोणत्याही दबावाला न जुमानता लोकशाहीची चौथी स्तंभ म्हणून जबाबदारी पार पाडावी.”
त्यांनी आजच्या पत्रकारितेतील बदल, सोशल मीडियाचा प्रभाव, खोट्या बातम्यांचा प्रसार आणि टीआरपीच्या शर्यतीवरही चिंता व्यक्त केली. “विश्वासार्हता ही पत्रकारितेची खरी संपत्ती आहे. ही टिकवण्यासाठी सतत सजग राहावं लागतं,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनीही ‘स्वातंत्र्योत्तर आणि आजची पत्रकारिता’ यामधील फरक अधोरेखित केला. “पुरस्कार म्हणजे केवळ गौरव नसून तो एक जबाबदारीही असतो. दबावापुढे झुकणारी पत्रकारिता हा लोकशाहीसाठी धोका आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
विशेष सन्मान मिळालेल्या नाट्यकर्मी भरत जाधव यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “मी एका चित्रपटात पत्रकाराची भूमिका साकारली होती. त्यातून पत्रकारांच्या जीवनातील धडपड आणि सत्यशोधाचा संघर्ष मला जवळून समजला.”
यावेळी पत्रकार महेश म्हात्रे यांनीही आषाढी एकादशीचा संदर्भ देत सर्व वारकरी भाविकांसह पत्रकार बंधूंनाही वंदन केले.
कार्यक्रमात मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर, कोषाध्यक्ष अनिल वाघमारे, डिजिटल मिडिया प्रमुख विशाल परदेशी, उपाध्यक्ष विनायक सानप, दीपक पवार, पांडुरंग म्हस्के, शरद पाबळे, सुरभाई शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
हा संपूर्ण सोहळा अत्यंत सुसज्ज आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला. पुरस्कारप्राप्त सर्व पत्रकारांना उपस्थित मान्यवरांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि पुढील वाटचालीसाठी प्रेरणा दिली.