प्रतिनिधी : राज्यात अवकाळी पावसाचा प्रभाव आता कमी झाला असून राज्यासह देशात उन्हाचा ताप चांगलाच वाढत आहे. देशात अनेक ठिकाणी तापमान 45 अंशापर्यंत पोहचले आहे. तर राज्यातही वाढलेल्या उकाड्याने अंगाची काहिली होत आहे. आता राज्यात आणखी तीन दिवस उन्हाचा चटका आणखी वाढण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबई, ठाणे, रायगडसह मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून हवामान खात्याने या ठिकाणी उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे.
मुंबईसह किनारपट्टीचा भाग, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने या ठिकाणी उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. देशात उन्हाळा सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. उत्तर भारतासह दक्षिण भारतात उष्णतेची लाट आली आहे. गुजरात, राजस्थानवरून उष्ण वारे किनारपट्टी आणि उत्तर महाराष्ट्रातून राज्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील तापमानातही वाढ होत आहे. या उष्ण वाऱ्यांच्या प्रभावामुळे पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे.
उन्हाचा चटका वाढल्याने दिवसभर उन्हाच्या झळा बसणार असून उकाड्याने अंगाची काहिली होणार आहे. तर रात्रीही उकाडा जाणविण्याची शक्यता आहे. विदर्भात पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात पारा 40 अंशांवर गेला आहे. मुंबईसह कोकण, खान्देश, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील एकूण 22 जिल्ह्यांत पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे.