मुंबई, दि. २ जुलै : राज्यातील भाजपा युतीचे सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडाले आहे. फक्त टेंडर काढायचे व कमीशन लाटायचे हा एकमेव उद्योग सुरु आहे. मुंबईतील अनेक कामांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. अंधेरी (गाव) येथील CTS नं. 207 वर सुरू असलेल्या बांधकाम कामांना त्वरित स्थगिती देण्याची आणि स्वतंत्र चौकशी करावी आणि जुहू लेन/बर्फीवाला रोडजवळील 4497.10 चौ.मी. क्षेत्रफळ असलेल्या महत्त्वाच्या भूखंड व्यवहारात 1200 कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. याची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
राजीव गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना खासदार प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुंबईतील SRA विभागातही भ्रष्टाचाराचा सुळसुळाट आहे. विभागातील अधिकारी व सत्ताधारी पक्षांचे नेते संगनमताने मुंबईची लुट करत आहेत आणि गोरगरिब झोपडपट्टीतील लोकांवर अन्याय करत आहेत. मागच्याच आठवड्यात आम्ही SRA विभागात बैठकीसाठी गेलो होतो पण मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर हा सत्ताधारी नेत्यांशी सेटींग करत बसले होते, गोरगरिब जनतेच्या प्रश्नावर त्यांना वेळ नाही. मी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, नगरविकास विभाग आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून अंधेरी (गाव) येथील CTS नं. 207 वर सुरू असलेल्या बांधकाम कामांना त्वरित स्थगिती देण्याची आणि स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. जुहू लेन/बर्फीवाला रोडजवळील 4497.10 चौ.मी. क्षेत्रफळ असलेल्या महत्त्वाच्या भूखंडावर SRA आणि आश्रय योजना अशा दोन परस्परविरोधी पुनर्विकास योजनांना मंजुरी देण्यात आली आहे, जी कायद्याचे, नागरी नीतीचे आणि जनतेच्या विश्वासाचे उल्लंघन करणारी आहे. या सर्व प्रकरणाची कायदेशीर चौकशी करण्याची नगरसेविका मेहर हैदर यांनी केली होती परंतु अद्यापपर्यंत महापालिकेने उत्तर दिले नाही. या संदर्भात २७ जून रोजी अश्रफ आझमी यांनी पत्र लिहून विचारले कि, आश्रय योजना अंतर्गत अद्याप काम सुरु केले नसताना आपण त्यांना दहा करोड रुपये का दिले ? यावर बीएमसी ने स्पष्टीकरण द्यावे.
२०२४ मध्ये ८५ झोपडीधारकांना पर्यायी व्यवस्था न देता त्यांना अपात्र करून बेघर करण्यात आले. कारण विकासकाला फायदा व्हावा. नियमानुसार हे सर्व रहिवाशी २०११ च्या पुनर्वसन योजनेनुसार पात्र आहेत. त्यानंतर २०२५ रोजी विकासकाने बेकायदेशीररीत्या कब्जा करून आपल्या नावाचा बोर्ड लावला आहे.
SRA ची NOC रद्द न करता नवीन विकासकाची नेमणूक आणि आश्रय योजनेसाठी मंजूरी का दिली?
नविन विकासकाची नेमणूक करण्यापूर्वी झोपडपट्टी अधिसूचना मागे का घेतली नाही ? या ठिकाणी राहत असलेल्या रहिवाश्यांची पात्रता निश्चित न करता, त्यांचे पुनर्वसन कुठे होणार या संदर्भात कोणतीही चर्चा न करता, करारनामा न करता आपण आश्रय योजना रद्द करण्याचा निर्णय कसा घेतला ? याचे उत्तर महानगरपालिकेने द्यावे.
आमची मागणी आहे की CTS -207 वरचे सर्व काम त्वरित थांबवावे. कायद्याचे उल्लंघन करत परवनगी दिलेल्या दोन्ही योजना रद्द कराव्यात. 85 झोपडीधारकांना कायमस्वरूपी घरे मिळेपर्यंत भाडे किंवा संक्रमण शिबीर द्यावे. 1200 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराची स्वतंत्र न्यायालयीन चौकशी करावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. ही कारवाई नाही केली तर या भ्रष्टाचाराविरोधात मुंबई काँग्रेस कोर्टात जायलाही मागेपुढे पाहणार नाही असा इशारा खा. वर्षा गायकवाड यांनी दिला. आजच्या पत्रकार परिषदेला खासदार वर्षाताई गायकवाड, माजी नगरसेवक मोहसिन हैदर, अशरफ आझमी, मुख्य प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, अर्शद आझमी, शकील चौधरी इत्यादी उपस्थित होते.
महायुती सरकार मस्त, मुंबईकर त्रस्त या शीर्षकाखाली मुंबई काँग्रेस दर आठवड्याला सरकारच्या घोटाळ्यांचा पर्दाफाश करेल व त्याची माहिती पत्रकार परिषदेतून दिली जाईल असे खासदार गायकवाड म्हणाल्या.