प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीची राष्ट्रवादाची विचारधारा तसेच मोदी सरकारचे लोकोपयोगी निर्णय राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन सामान्य माणसापर्यंत नेऊन पोहचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांच्या साथीने पार पाडेन, असा निर्धार भारतीय जनता पार्टीचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी व्यक्त केला.
वरळी डोम येथे प्रचंड उत्साहात पार पडलेल्या पक्षाच्या राज्य परिषदेच्या अधिवेशनात श्री. चव्हाण यांनी मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर बोलताना श्री. चव्हाण म्हणाले की, माझ्या सारख्या सामान्य कुटुंबातून आलेल्या छोट्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीसारख्या मोठ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाते ही फार मोठी गोष्ट आहे. भारतीय जनता पार्टीमध्येच हे घडू शकते. ही जबाबदारी सोपविल्याबद्दल मी पक्षाचा आभारी आहे.
या पुढील काळात भारतीय जनता पार्टीची राष्ट्रवादाची विचारधारा राज्याच्या कानाकोपऱ्यात न्यावयाची आहे. भाजपाची विचारधारा निर्मळ आणि प्रवाही आहे. देशासाठी अहोरात्र काम करूनही मोदी सरकारबद्दल अपप्रचार केला जातो. हा अपप्रचार खोडून काढण्यासाठी आपणा सर्वांना मोदी सरकारची तसेच राज्यातील महायुती सरकारची कामे जनतेपर्यंत न्यायची आहेत. आता 2029ची निवडणूक डोळ्यापुढे ठेवून आपल्याला तयारीला लागायचे आहे. रामभाऊ म्हाळगी यांनी सांगितल्या प्रमाणे आपल्याला पायाला भिंगरी लावून, डोक्यावर बर्फ ठेवून आणि तोंडात साखर ठेवून कार्यकर्त्यांनी काम करायचे आहे. आगामी काळात राज्यात भारतीय जनता पार्टीला सशक्त बनविण्याचा संकल्प प्रत्येक कार्यकर्त्याने करायचा आहे, असेही श्री. चव्हाण यांनी नमूद केले.
मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, तीन वर्षांपूर्वी माझ्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली गेली त्यावेळी ही जबाबदारी आपल्याला पेलवेल की नाही असे वाटत होते. मात्र देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या पाठबळावर आपण ही जबाबदारी पेलण्याचा प्रयत्न केला. दीड कोटी सदस्य नोंदणीचा विक्रम सर्वांच्या सहकार्याने करता आला. लोकसभा निवडणुकीत अपेक्षेनुसार कामगिरी झाली नाही याची खंत आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवल्या.
51 टक्के मते घेऊन सर्वाधिक संख्येने महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष निवडून आणण्याचा संकल्प रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली साध्य करायचा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या लोकोपयोगी निर्णय सामान्य माणसापर्यंत नेण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावयाचे आहे, असेही श्री. बावनकुळे यांनी नमूद केले. श्री. बावनकुळे यांनी यावेळी सर्व प्रदेश सरचिटणीस, पदाधिकारी आणि राज्यभरातील कार्यकर्त्यांचे आभार मानले.
मुंबई अध्यक्ष आ. आशीष शेलार यांनी सांगितले की चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कारकीर्दीत पक्षाची भक्कम बांधणी करत पक्षाला विजयपथावर नेले. रवींद्र चव्हाण हे आगामी निवडणुकीत सर्व ताकदीने काम करून सर्व विरोधकांना त्यांची जागा दाखवतील.
हजारो कार्यकर्त्यांच्या उत्साही जल्लोषात, वाद्यांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून मा. रविंद्र चव्हाण यांची निवड केंद्रीय निवडणूक अधिकारी व केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी मंगळवारी मुंबईत घोषित केली.
श्री. चव्हाण यांची निवड जाहीर केल्यानंतर श्री. किरण रिजीजू यांनी त्यांना निवडीचे प्रमाणपत्र प्रदान केले. मावळते प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मा. रविंद्र चव्हाण यांना पक्षाचा ध्वज देऊन प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय निवडणूक अधिकारी व केंद्रीय मंत्री किरण रिजिजू, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय सरचिटणीस व निरीक्षक अरुण सिंह, श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, पर्यावरण मंत्री व राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, भाजपा मुंबई अध्यक्ष व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, निवडणूक अधिकारी चैनसुख संचेती, माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे तसेच राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री यावेळी उपस्थित होते.