प्रतिनिधी : महायुतीला अखेर नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा सोडवण्यात यश आलं आहे. दोन टर्मपासून खासदार असलेल्या हेमंत गोडसे यांनाच शिवसेनेनं पुन्हा उमेदवारी दिली आहे. गोडसे २०१४ पासून नाशिकचे खासदार आहेत. महाविकास आघाडीत ही जागा ठाकरेंची शिवसेना लढवत आहे. ठाकरेसेनेकडून नाशिकमधून राजाभाऊ वाजेंना तिकीट देण्यात आलं आहे. त्यामुळे नाशिकमध्ये आता गोडसे विरुद्ध वाजे अशी लढत होईल. दोन शिवसैनिक आमनेसामने असतील.
शिंदेसेनेत असलेले हेमंत गोडसे २०१४ पासून नाशिकचे खासदार आहेत. त्यामुळे ही जागा शिवसेनेला मिळणार अशीच चर्चा होती. पण त्यानंतर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसनं नाशिकमध्ये असलेल्या ताकदीच्या जोरावर दावा सांगितला. त्यामुळे नाशिकची जागा चर्चेत आली. राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांचं नाव सर्वात पुढे होतं. त्यांची नावाची चर्चा थेट दिल्लीत झाली. याची माहिती खुद्द भुजबळ यांनीच दिली होती.
श्रीकांतचं ‘कल्याण’, विचारेंना बाय; शिंदेंनी नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्याचं कारण काय?
तिन्ही पक्षांचा दावा असल्यानं नाशिकची जागा अतिशय प्रतिष्ठेची बनली. हेमंत गोडसेंनी त्यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार फिल्डींग लावली. त्यांनी अनेकदा मुंबईवाऱ्या केल्या. ठाण्यात येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचे खासदारपुत्र श्रीकांत शिंदेंच्या भेटीगाठी घेतल्या. श्रीकांत शिंदेंनी हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीरदेखील केली. त्याचे पडसाद नाशिकमध्ये आणि महायुतीमधील अन्य दोन पक्षांत उमटले.
ठाण्यातून नरेश म्हस्के, कल्याणमधून श्रीकांत शिंदे; शिवसेनेकडून उमेदवारांची घोषणा
नाशिकच्या जागेचा पेच खूप दिवस कायम राहिला. उमेदवारी जाहीर होण्यास जितका उशीर होईल तितकं अधिक नुकसान होण्याची भीती व्यक्त करत भुजबळांनी त्यांचा नाशिकवरील दावा सोडला. मात्र त्यानंतरही नाशिकचा पेच कायम राहिला. राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांच्या वाट्याला आलेली साताऱ्याची जागा भाजपच्या उदयनराजे भोसलेंसाठी सोडली. त्यामुळे त्यांनी साताऱ्याच्या बदल्यात नाशिकची जागा मागितली. त्यामुळे नाशिकचा तिढा कायम राहिला. अखेर आज हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर झाली आणि नाशिकचा सस्पेन्स संपला.
उद्या नाशिकचा उमेदवार जाहीर होईल, परवा
नाशिकमधून महायुतीनं हेमंत गोडसे यांनाच संधी दिल्यानं इथे दोन शिवसैनिकांमध्ये संघर्ष पाहायला मिळाले. ठाकरेंनी इथून राजाभाऊ वाजेंना उमेदवारी दिली आहे. त्यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे गोडसे प्रचारात पिछाडीवर पडले आहेत. नाशिकची जागा लढवण्यास उत्सुक असलेल्या भाजप, राष्ट्रवादीला सोबत घेण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असेल. २००९ मध्ये मनसेकडून लढलेले हेमंत गोडसे २०१४ मध्ये सेनेच्या तिकिटावर लढले आणि विजयी झाले. २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी त्यांना पुन्हा संधी दिली. शिंदेंच्या बंडानंतर त्यांनी शिंदेंना साथ दिली.