गोंदवले(अजित जगताप) : श्री ब्रह्मचैतन्य महाराज स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गोंदवले नगरीमध्ये भाविक मोठ्या संख्येने येतात. श्री चे दर्शन घेऊन आनंदाने जातात. त्याच गोंदवल्यामध्ये मोबाईल चोरी करताना एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. सध्या श्री ज्ञानेश्वर माऊलीची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत असताना हा प्रकार घडला आहे. धरला पंढरीचा चोर ऐवजी आता धरला गोंदवल्यात महिला चोर असं म्हणण्याची पाळी आलेली आहे.
याबाबत माहिती अशी की, महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र म्हणून दुष्काळी माण तालुक्यातील श्री ब्रह्मचैतन्य महाराज स्वामी यांच्या गोंदवले या तीर्थक्षेत्राला खूप मोठे महत्त्व आले आहे. या ठिकाणी हिंदू धार्मिक सण व इतर महत्त्वाच्या दिवशी भाविकांची खूप मोठी गर्दी होते. दर्शन आणि प्रसाद या दोन्ही दृष्टीने भाविकांची मनशांती व भूक सुद्धा भागवली जाते. त्यामुळे अनेक जण तिथे भेट देतात. काही जण मनोभावे देवाची आराधना करतात. तर काहीजण पोटासाठी येत असले तरी एका महिलेने रांगेत उभे राहून देवाच्या दारातच मोबाईल चोरीचा प्रकार केला. सदर बाब दर्शनासाठी आलेल्या फिर्यादी महिलेबाबत घडली. त्या रांगेत उभ्या होत्या. त्याचवेळी रांग पुढे जात असतानाच एका महिलांनी चोरीच्या उद्देशाने भाविक महिलेच्या पाठीमागे असलेल्या पिशवीतून मोबाईल हातोहात लंपास केला. जेव्हा दर्शन घेऊन भाविक महिला बाहेर आल्या. तेव्हा पिशवीतील मोबाईल नसल्याची जाणीव झाली. त्यांनी शोध सुरू केल्यानंतर त्यांना मोबाईल सापडला नाही. अखेर त्यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवली.
दहिवडी पोलीस ठाण्याचे स. पो .नि.दत्तात्रय दराडे यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला व गोंदवले येथे जाऊन सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. तेव्हा एका महिलेची संशयित हालचाली दिसून आल्या. त्यांनी याबाबत त्या महिलेचा शोध घेतला व गोड बोलून विचारपूस केल्यानंतर त्या महिलेने गुन्ह्याची कबुली दिली. सदर महिला ही गोंदवल्यामध्ये सापडल्यामुळे तिच्याकडून मोबाईल सुद्धा जप्त करण्यात आला. भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. चोरीच्या उद्देशाने आलेल्या या महिलेकडे कसून चौकशी सुरू आहे .आणखीन काही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सध्या पंढरपूरच्या दिशेने श्री ज्ञानेश्वर पालखीचे सातारा जिल्ह्यातून प्रस्थान होत आहे. त्यावेळी अनेक जण गोंदवले येथे स्वामींचे दर्शन घेतात. त्यामुळे खूप मोठी गर्दी मंदिर परिसरात असते. गोंदवले मंदिर परिसरात देवस्थानच्या वतीने सी.सी.टी.व्ही.मुळे व पोलिसांच्या प्रयत्नाने चोरीचा गुन्हा उघडकीस आलेला आहे. धरला पंढरीचा चोर… हे चित्रपटातील गाणे ऐकत असतानाच आधुनिक युगात पोलिसांनी धरली महिला चोर.. असे आता काही जण बोलू लागले आहेत. या गुन्ह्या संदर्भात दहिवडी पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी दत्तात्रय दराडे यांच्यासह पोलीस हवालदार गाढवे, खाडे, कुदळे यांनीही तपासासाठी परिश्रम घेतले.
………………………
फोटो – सपोनि दत्तात्रेय दराडे
व सीसीटीव्ही चित्र