प्रतिनिधी : “पारदर्शक सरकार असूनही रस्त्यावर पारदर्शकता दिसत नाही,” अशा शब्दांत गाडी चालक व मालक गौरव गो. शामकुले यांनी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या व्यथा मांडत पत्र पाठवले आहे.
शामकुले यांनी आपल्या निवेदनात सांगितले की, सर्व कागदपत्रे ऑनलाईन असूनही, वाहतूक पोलीस, ट्राफिक पोलीस, आरटीओ अधिकारी रस्त्यावर विनाकारण अडवून लाच मागतात. पेपर क्लिअर असताना देखील १०० ते १०००० रुपयांची मागणी होते, न दिल्यास खोट्या गुन्ह्यांची धमकी दिली जाते.
ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यांमध्ये अशी परिस्थिती नाही. गुजरात, कर्नाटक, केरळ, यूपी आदी राज्यांतील पोलिसांचा वागणूक सुसंस्कृत असून मार्गदर्शनात्मक असते. परंतु महाराष्ट्रातच लाचखोरी व दबावाची भाषा पाहायला मिळते.
शामकुले यांनी सांगितले की, शासन स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देते, बँकेकडून कर्ज घेत वाहन खरेदी केली जाते. मात्र, रस्त्यावर होणाऱ्या त्रासामुळे चालक व मालक संकटात सापडले आहेत. शेवटी “सरकार व कायद्यावरून सामान्य माणसाचा विश्वास उडण्याचा धोका आहे,” असेही ते म्हणाले.
या निवेदनाची प्रत स्थानिक खासदार व आमदारांना पाठवून या .समस्येकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.