Sunday, July 27, 2025
घरमहाराष्ट्रलोककलेचा नवजाणीवाचा काळ....!खंडूराज गायकवाड (लेखक मंत्रालयातील जेष्ठ राजकीय पत्रकार असून लोककलेचे अभ्यासक...

लोककलेचा नवजाणीवाचा काळ….!खंडूराज गायकवाड (लेखक मंत्रालयातील जेष्ठ राजकीय पत्रकार असून लोककलेचे अभ्यासक आहेत.)

नवजाणीवा किंवा मूल्ये यांचा जेव्हा आपण विचार करतो.तेव्हा लक्षात येते की,काळानुरूप लोककला क्षेत्रातही बदल – परिवर्तन घडले पाहिजे.नवजाणीवा म्हणजे नवीन जाणीव,नवीन बदल,नवीन दृष्टीकोन होय.

तमाशा,लावणी,पोवाडे,भारूड,,खडीगंमत,दशावतार,. जागरण – गोंधळ,अशा विविध प्रयोगात्मक लोककला या प्रत्येक स्तरावर प्रत्येक कालखंडात नवजाणीव व मूल्ये यांचे संशोधनात्मक दृष्टीकोनातून पाहिले तर त्यांचे स्वरूप बदलत गेले आहे. प्रत्येक कालखंडातील कलावंतांना त्या – त्या सद्या परिस्थितीत अतिशय तीव्रपणे आपल्या कलेतून भूमिका साकाराव्या लागल्या.त्याचे स्वरूप आपण जेव्हा बारकाईने पाहतो.तेव्हा लक्षात येते की,त्या नवसंवेदना,नवजाणीवा आणि नवविचार प्रकट होणे ही त्या – त्या काळाची गरज असायची.

. मानवी संस्कृती कधी स्थिर नसते.प्रत्येक समाजाची संस्कृती हळूहळू का होईना परंतु नियमित परिवर्तन घडवून आणते.बदल्यात परिस्थितीनुसार मग मानवी समाजात निर्माण होणाऱ्या समस्यावर “उतारा” म्हणून हेच लोककलावंत आपल्या लेखणीतून किंवा काव्यातून आपली मतं.. आपले विचार.. समाजापर्यत पोहचवून ‘समाज प्रबोधन’ करीत असतात.
परंतु आता जुन्या लोककलांमध्ये बदल होणे अपरिहार्य झाले आहे.जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे आपली लोक परंपरा हस्तारीत होत असताना,काही बाबी वगळल्या जातील.काही नव्या गोष्टींची भर टाकली जाईल.सामाजिक जीवनपद्धती आणि प्रगती,या बदलांमुळे यापुढे लोककला परंपरेत आमूलाग्र बदल घडताना दिसतील.याबद्दल शंका नाही.कारण प्रगतीकडे जात असताना समाजाचा आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे जगाशी संपर्क होवू लागला आहे.आता समाजाची दृष्टी बदलली.त्यामुळे लोक परंपरेला छेद देत,आता नवीन मूल्ये लोककलावंत स्वीकारायला लागला आहे.थोडक्यात आता आपली कोणतीही लोकपरंपरा लोकसंस्कृती जशीच्या तशी राहणार नाही.

मराठी लोक साहित्याचा कालखंड लक्षात घेतला तर त्या -त्या कालखंडात लोककलेने आपली कूस बदलली आहे. यादवकाळ,बहामनीकाल शिवकाल,अव्वल इंग्रजी कालखंड,आणि आधुनिक कालखंड,असे टप्पे पाहता. अन यांचा आपण अभ्यास केला तर या सर्व कालखंडात लोककलावंतांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.मौखिक परंपरेने सुरु झालेली लोककला आज लिखित स्वरूपात उपलब्ध झाली आहे.
.

. लोककलावंतांचा ‘प्रबोधन चळवळी’चा काळ….!

पेशवाईच्या काळात लोककलावंतांना राजाश्रय मिळाला.मात्र पेशवाईच्या अस्तानंतर समाज प्रबोधन चळवळीचा खरा काळ लोककलावंतांसाठी सुरू झाला होता.कारण वर्णन व्यवस्था,सामाजिक अस्पृश्यता,अंधश्रद्धा,जाचक रूढी परंपरेचा प्रभाव,यामुळे समाजा – समाजात मोठी विषमता निर्माण झाली होती.त्या विरोधात समाज प्रबोधन करण्याचे आव्हान लोककलावंतांनी स्वीकारले होते.त्यांनी आपल्या कलेतून वर्णवर्चस्ववादी प्रवृत्तीला शह दिला.त्या काळात खूप मोठी जबाबदारी लोक कलाकारांवर होती.कारण त्यावेळी समाजामध्ये परिवर्तन घडवून आणणायचे एकच माध्यम होते.ते म्हणजे लोककला.
त्यामुळे लेखणीतून – काव्यातून आपल्या भावना आणि विचार कलाकारांनी लोकरंगभूमीवर मांडले.हा प्रबोधन चळवळीचा कालखंड इ स 1818 ते पासून ते साधारपणे भारत स्वतंत्र होईपर्यत ग्राह्य धरला जातो.याकाळात संत साहित्य,भारूड,शाहिरी,तमाशा,
लोकनाट्य,गोंधळ,वासुदेव,अशा अनेक लोककलेच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन झाले.

लोककला भारतीय संस्कृतीचा आणि मूल्यांचा पुरस्कार करतात.तशा त्या मूल्यांना प्रश्नही विचारताना दिसतात.शासन व्यवस्थे विरुद्ध बंडही करू शकतात.त्या समाजाच्या समस्या मांडतात.त्या समस्यांना भिडण्याची ताकद फक्त लोककलांमध्येच आहे.असे अनेक विचारवंतांनी मतं मांडली आहेत.मिथक कथा,पौराणिक कथा,लोककथा,ऐतिहासिक कथा,दृष्टांत कथा,गुढ कथा,सामाजिक -ग्रामीण कथांची प्रेरणा घेवून आपल्या् कलेच्या माध्यमातून भिन्न मत मांडण्याला वाव लोकरंगभूमीला दिला आहे. तेथे कोणतीही संहिता नाही.हे त्यांचे गुणवैशिष्ट्ये आहेत.

नवजाणीवाचा काळ…!

परंतु आज लोककलामधील नवजाणीवा आणि मूल्य याचे स्वरूप बदलले आहे.स्थळ -काळ आणि परिस्थिती याचा विचार अधिक बारकाईने त्यांना करावा लागतो.प्रवाहाबरोबर त्यांना चालावा लागणार आहे.मात्र हे सर्व करीत असताना त्यांना समाज भान असले पाहिजे.याबद्दल कोणाचे दुमत नाही. अनेक लोककलांनी आता आपले स्वरूप बदलले आहे.शहरी -नागरी भागात नवीन होतकरू तरुण कलाकारांनी जुन्या परंपरेचा बाज घेवून आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन लोककलेचे ‘शो’ व्यावसायिक थिएटरमध्ये सुरू केले आहेत. त्यामध्ये तुम्हाला यामध्ये गण,गवळण,बतावाणी,जागरण गोंधळ,पारंपारिक लोकगीतं नव्या चालीत बांधून सादर करताना दिसतात. सध्याच्या काळानुसार त्याचं उत्तम मार्केटींग पण करीत आहे.कुठेही विनोदात अचकट विचकटपणा नाही.वाह्यात शब्द फेक नाही.अश्लील,बिभत्स असभ्य संवाद यामध्ये तुम्हाला दिसणार नाहीत. मुंबई पुणे सारख्या शहरामध्ये या ‘दि फोक आख्यान “सारखे शो सध्या प्रचंड हाऊसफुल सुरू आहेत.. यांची दखल पारंपारिक लोककला सादर करणाऱ्या कलावंतांनी. आता घेतली पाहिजे. अन यावर आत्मचिंतन केले पाहिजे.तरच महाराष्ट्राची पारंपारिक लोककला आणि लोककलावंत यांचा नव काळात निभाव लागेल.

लेखक : खंडूराज गायकवाड
मेल -khandurajgkwd@gmail.com
संपर्क 9819059335

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments