दहिवडी(अजित जगताप) : सातारा जिल्ह्यातील दुष्काळी माण खटाव आणि फलटण विधानसभा मतदारसंघांमध्ये युवा नेते शेखर गोरे यांनी करिष्मा केला आहे. माणगंगा नदीत राजकीय शत्रुत्व बुडवून बंधु प्रेमाची नौका सुखरूप तीरावर पोहोचवली आहे. त्यामुळे आता सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद सदस्य निवडणुकीत युवा नेते शेखर गोरे यांच्या आमदारकीसाठी जय हो चा नारा सुरू झाला आहे. तशी चर्चा आता दोन्ही जिल्ह्यात होत आहे. राजकीय दृष्ट्या सर्वच राजकीय अडचण आता दूर झाली आहे.
गेल्या वेळेला सातारा जिल्ह्यामध्ये मताधिक्य असताना सुद्धा महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार युवा नेते शेखर गोरे यांना निसटता पराभव पत्करावा लागला. या पाठीमागे अनेक कारणे असले तरी राजकीय झारीतील शुक्राचार्य आता सर्वांनीच ओळखले आहेत. आता आली रे आली…. तुमची बारी आली… ही राजकीय बाराखडी सुरू झालेली आहे. तेल लावलेला पैलवान भुई सोडत नाही. तशा पद्धतीने युवा नेते शेखर गोरे यांनी पुन्हा एकदा आमदारकीसाठी नारा दिलेला आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती नगरपालिका, नगरपंचायत या निवडणुका झाल्यानंतर नव मतदारांसाठी म्हणजेच सदस्यांसाठी विधान परिषदेच्या निवडणूक वाट पाहत आहे.
युवा नेते शेखर गोरे यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत माण – खटाव व फलटण मतदार संघात महायुतीच्या उमेदवारांचा प्रामाणिकपणे प्रचार केला. त्यांच्या समर्थकांनी पायाला भिंगरी लावून भाजप कमळ व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाचा प्रचार करून माण- खटाव व फलटण मध्ये निर्विवाद वर्चस्व निर्माण केले. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत व्याजासह त्याची परतफेड करण्यासाठी शेखर गोरे यांना आमदार बनवण्यासाठी महायुती सज्ज झालेली आहे.
सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ५६२ मतदार होते. त्यामध्ये वाढ होऊन ६०० पर्यंत मतदार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पूर्वी सांगली जिल्हा २६१ व सातारा ३०१ मतदार होते. आता त्यामध्ये वाढ होणार आहे. तरी सुद्धा बहुतांश सदस्य हे महायुतीचे असल्याने विजय दृष्टिक्षेपात आलेला आहे. असे राजकीय निरीक्षक सुद्धा बोलू लागले आहेत.
युवा नेते शेखर गोरे यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवून आपल्या सामाजिक कार्याची ओळख अनेकदा करून दिलेली आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यामुळे सातारा– सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षाचे नेतेगणमंडळी युवा नेते शेखर गोरे यांना आमदार म्हणून विधानभवनात पाठवणारआहेत .हे निश्चित झालेले आहे. राजकारणामध्ये दिलेला शब्द पाळला नाही तर काय होते? हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना समजलेले आहे. अशी खाजगीत चर्चा आहे.
राजकीय डावपेच करताना दुधाने तोंड भाजले की ताक सुद्धा फुकून प्यावे लागते. हे सांगण्याची ज्योतिषांची गरज नाही. त्यामुळे युवा नेते शेखर गोरे आमदार नक्कीच होणार आहेत .याबद्दल आता महायुतीमध्ये कोणतीही शंका राहिलेली नाही. वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा अनुकूलता दर्शवली आहे. कार्यकर्त्यांची ही मानसिकता झालेली आहे. आता औपचारिकता बाकी आहे. हे मात्र खरे.
——————————-
चौकट– राजकारणामध्ये पूर्वी वसंतराव नाईक- सुधाकरराव नाईक, रामराव आदिक ,गोविंदराव आदिक, मोहिते-भोसले, मोहिते पाटील , विलासराव देशमुख व त्यांचे बंधू, गोपीनाथ मुंडे- पंडितराव मुंडे, रामराजे नाईक निंबाळकर– संजीव राजे नाईक निंबाळकर, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समवेतच कोकणातही अलीकडच्या राजकारणात निलेश राणे- नितेश राणे , तटकरे बंधू, प्रीतम मुंडे-पंकजा मुंडे, यांच्यानंतर आता सातारा जिल्ह्यातही नव्याने ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे व शेखर गोरे आणि अंकुश गोरे या त्रिमूर्तीचे पर्व सुरू झालेले आहे. त्यामुळे डबल इंजिन लागून विकास कामे वेगाने होत आहेत. आशिक कार्यकर्त्यांची ही धारणा झालेली आहे.
____________________
फोटो — कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना युवा नेते शेखर गोरे (छाया- अजित जगताप, दहिवडी)