काले (ता. कराड) – काले गावाकडे जाण्यासाठी विविध मार्ग आहेत. त्यापैकी काळेफाटा, धोंडेवाडी फाटा आणि वाठारमार्गे रस्ते पूर्वीपासूनच प्रचलित आहेत. त्याचप्रमाणे प्रसिद्ध डाळिंब बागेवरून काले गावाकडे जाणारा नवीन रस्ता अलीकडेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून काँक्रिटकरण करून तयार करण्यात आला. मात्र, सदर रस्त्याचे काम करताना ठेकेदाराकडून झालेली गंभीर दुर्लक्षता सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
रस्ता तयार करताना वाहतुकीस बंद न केल्यामुळे, काम सुरु असतानाच बैलगाड्या व इतर वाहने रस्त्यावरून नियमितपणे फिरत राहिल्या. यामुळे ओल्या काँक्रिटवर बैलगाड्यांच्या चाकांचे खोल ठसे उमटले आणि संपूर्ण काँक्रिट खचले. परिणामी, रस्ता सुरु होण्याआधीच खराब स्थितीत गेला असून वाहनधारकांना त्यावरून ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांमध्ये यामुळे तीव्र संताप आहे. रस्त्याचे योग्य नियोजन न करता काम केले गेले असून, संबंधित ठेकेदाराची जबाबदारी निश्चित करून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
तसेच, सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकाराकडे तातडीने लक्ष द्यावे आणि सदर रस्ता नव्याने दर्जेदार पद्धतीने तयार करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशीही जोरदार मागणी होत आहे.