कुडाळ (अजित जगताप) : जावळी तालुक्यातील महायुती म्हणजे एकामेकांशी पटेना आणि राजकीय करमेना. अशी गत झाली आहे. जावळी तालुक्यात काही काळ्या यादीत नाव टाकण्यास लायक असलेले काही मर्जीतील ठेकेदारीच्या निकृष्ट कामांमुळे महायुतीतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना जावळीत आक्रमक झाली आहे. थेट आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदीप पवार यांनी दिला आहे. विकास नेमका जनतेचा की ठेकेदारांचा? याचा जाब विचारण्याची वेळ आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांना जावलीतून वाढता पाठिंबा मिळत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळीकरांनी नेहमीच सत्ताधाऱ्यांना साथ दिलेली आहे. आदरणीय सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे नेहमीच विकासकामांबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवतात. पण त्यांचे काही कार्यकर्ते जावळीला दुजाभाव करीत आहेत. त्यामुळे आता जावळीतील नवी पिढी आक्रमक झालेले आहे. सध्या सातारा येथून रिमोट कंट्रोल करणारे स्वयंभू नेते विकास कामाचे टेंडर निघाल्यानंतर ठेकेदारांची नावे सुचवत आहेत. त्यामुळे आखेगणी-बनवडी, आनेवाडी ते मोरघर खिंड , म्हसवे – सरताळे, आलेवाडी खिंड- मेढा, पाचगणी- करहर- कुडाळ- पाचवड आणि सातारा- बामणोली , रांनगेघर- करंडी, भालेकर ते मार्ली , आखाडे फाटा ते रुईघर या रस्त्याची कामे घाईगडबडीत झाल्यामुळे सध्या कठडे तुटले आहेत . रस्त्यात खड्डे पडले. छोटे मोठे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. पावसाळ्यात रस्त्यावर नक्षीकाम केल्यासारखे डबकी दिसू लागलेली आहेत. काही ठेकेदार म्हणजेच निष्ठावंत कार्यकर्ता असे समीकरण झाले आहे. पूर्वी जावळी तालुक्यात उत्कृष्ट काम करून काही ठेकेदारांनी आजही आपला नावलौकिक कायम ठेवला आहे. सर्वच ठेकेदार निकृष्ट दर्जाचे काम करत नसले तरी काही अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले ठेकेदार हे नेत्याची मर्जी सांभाळण्यासाठी दलालांच्या मार्गी कामे मिळवण्यासाठी संपर्क साधत आहेत. हेच दलाल आता जावळीकरांसाठी काळ ठरला आहे. त्यांना जाब विचारण्यासाठी आता शिवसैनिकच आक्रमक झाले असून उपजिल्हाप्रमुख संदीप पवार, विष्णू बेलोशे, सतीश पवार, रोहिदास चिकणे, शांताराम कदम, संजय सुर्वे, दीपक शिंदे ,लालसिंग शिंदे, श्रीराम गलगले, सचिन शेलार, अशोक भोसले, शशिकांत आखाडे अशी फौज आंदोलनासाठी आखणी करू लागलेली आहे.
आपल्याच हातून आपल्या पायावर धोंडा मारून घेणे. कदापि शक्य नाही. याची आता त्यांना जाणीव झालेली आहे. त्यामुळे जावळीकरांच्या खऱ्या खुऱ्या विकासासाठी शिवसैनिकच धावून आलेला आहे. त्यामुळे संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी उद्रेक होण्यापूर्वी सर्व रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून घ्यावी. अन्यथा शिवसेना स्टाईल त्यांच्यावर लोकशाही मार्गाने प्रहार केला जाईल. असा ही यानिमित्ताने शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदीप पवार यांनी दिलेला आहे. अद्यापही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्याबाबतही आवाज उठवण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. दरम्यान, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे विकास निधी व रस्ता दुरुस्ती बाबत त्यांची भूमिका समजू शकली नाही.
____________________
फोटो – जावळी तालुक्यात निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्याची अवस्था (छाया- अजित जगताप कुडाळ)