मुंबई : छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यव्यापी सामाजिक न्याय दो अभियानांतर्गत समाजातील तळागाळातील लोकांचे प्रश्न, समस्या सरकारदरबारी मांडण्यासाठी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले.
अभियानाच्या पहिल्या टप्प्यात मुंबई, खानदेश, विदर्भ हे विभाग घेतले. दुसऱ्या टप्प्यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील विविध जिल्हे असून, अभियानाची सांगता मुंबई विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात १० जुलैला होणार आहे अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
समाजकल्याण नागपूर विभागाचे निलंबित अधिकारी बाबासाहेब देशमुख यांनी अनुसूचित जाती जमाती महिला बचत गटाचा निधी गिळंकृत केला असल्याचा लेखी आरोप सरकारकडे दिला असल्याने त्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा अन्वये कारवाई करावी.
डझनभर गुन्हे असणारे पत्रकार रविंद्र कोटंबकर यांच्यावर संघटित गुन्हेगारी ( मोक्का) अंतर्गत कारवाई करावी,गोरगरीब विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मिळावी, दादासाहेब गायकवाड स्वाभिमान स्वावलंबी योजनांची अंमलबजावणी करावी, महात्मा फुले, अण्णा भाऊ साठे, संत रोहिदास, वसंतराव नाईक, आदिवासी विकास महामंडळामधून थेट कर्ज बेरोजगार तरुणांना देणे, रमाई घरकुल योजना जलदगतीने राबवावी. या मागण्या अभियानात केल्या आहेत.