प्रतिनिधी : राजकीय वर्तुळात सध्या मोठी हालचाल सुरू असून हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) शिवसेना ठाकरे गटाला एकत्र येण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे आंदोलनाची घोषणा केलेली असताना, मनसेने आता “एक मराठी एकजूट” या भूमिकेतून एकत्रित मोर्चाची मागणी पुढे ठेवली आहे.
मिळालेल्या खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार, मनसेने शिवसेना ठाकरे गटाकडे प्रस्ताव दिला आहे की दोन्ही पक्षांनी स्वतंत्र मोर्चे न काढता, हिंदी सक्तीविरोधात एकच मोर्चा काढावा. यामध्ये कोणताही राजकीय अजेंडा न ठेवता, कोणत्याही पक्षाचा झेंडा न वापरता केवळ मराठी अस्मिता हाच केंद्रबिंदू असावा, अशी भूमिका मनसेने घेतली आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जुलै रोजी मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे, तर उद्धव ठाकरे हे २९ जून आणि ७ जुलैला दीपक पवार यांच्या संघटनेच्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसेने हा समन्वयाचा प्रस्ताव दिला असून, दोन्ही पक्षांमध्ये दिवसभर संवादही झाला असल्याची माहिती आहे, मात्र अद्याप अंतिम निर्णय घोषित झालेला नाही.
गेल्या काही काळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय समीकरणांबाबत चर्चा रंगत असताना, हा प्रस्ताव विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. विशेष म्हणजे, मनसेने आपल्या मोर्चाची तारीखही बदलली असून तो ६ ऐवजी आता ५ जुलै रोजी काढण्यात येणार आहे.
राजकीय अजेंड्याच्या पलीकडे जात, मराठी भाषेच्या अस्मितेसाठी एकत्र येण्याचा हा प्रस्ताव राजकीय दृष्टिकोनातूनही लक्षवेधी ठरत आहे. आता ठाकरे गट या प्रस्तावाला कसा प्रतिसाद देतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.