Sunday, July 6, 2025
घरमहाराष्ट्रनागपूर, विदर्भमहाराष्ट्रातील खाजगी वसतिगृह संघटनेच्या कार्याध्यक्षपदी दयानंद कुबल यांची एकमताने निवड संघटनेच्या...

महाराष्ट्रातील खाजगी वसतिगृह संघटनेच्या कार्याध्यक्षपदी दयानंद कुबल यांची एकमताने निवड संघटनेच्या अध्यक्षपदी महेश निंबाळकर, तर सचिवपदी महेश यादव यांची नियुक्ती

मुंबई(समीर खाडिलकर/शांताराम गुडेकर) : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू मुलांसाठी खाजगी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून वसतिगृहे चालवली जातात.शिक्षण,संगोपन आणि संस्कार देणाऱ्या या संस्थांनी गेल्या काही वर्षांमध्ये हजारो मुलांचे जीवन बदलले आहे.मात्र,अलीकडील काही अपवादात्मक घटनांमुळे संपूर्ण वसतिगृह क्षेत्रच संशयाच्या छायेत सापडले आहे.परिणामी,प्रामाणिकपणे कार्यरत संस्थांनाही नोटिसा,चौकशी आणि कारवाईचा सामना करावा लागत आहे.या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी राज्यातील सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन ‘खाजगी वसतिगृह संघटना’ स्थापन केली आहे.या संघटनेच्या अध्यक्षपदी महेश निंबाळकर (पुणे) तर कार्याध्यक्षपदी दयानंद कुबल (मुंबई) यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
नव्या कार्यकारिणीत पुढील पदाधिकाऱ्यांचा समावेश-उपाध्यक्ष -ॲड. सुजाता अंगडी,जीवन संवर्धन फाउंडेशन, ठाणे,सचिव -महेश यादव,स्पर्श शेल्टर होम, पुणे,सहसचिव-अक्षदा भोसले,अंकुर सामाजिक संस्था-डोंबिवली,कोषाध्यक्षविश्वास लोंढे,शाश्वत उत्क्रांती प्रतिष्ठान, ठाणे,सदस्य-तेजस कोठावळे (आनंदग्राम गुरुकुल, पुणे),
ॲड. राजीव करडे (श्रावण बाळ आश्रम, पुणे),प्रसाद मोहिते (प्रार्थना फाऊंडेशन, सोलापूर),दत्ता इंगळे (जीवनविद्या परिवर्तन ट्रस्ट, पुणे),शरद आढाव (जनजागृती प्रतिष्ठान, अहिल्यानगर),मधुकर सोनवणे (खुशीग्राम फाऊंडेशन, लातूर),सुधीर भोसले (पारधी समाज जनजागृती सेवाभावी संस्था, बीड) यांचा समावेश आहे.
*ठोस नियमावलीची मागणी*
महाराष्ट्रातील खाजगी वसतिगृहांसाठी स्पष्ट, ठोस आणि बंधनकारक नियमावलीची मागणी ही संघटना करत आहे. २०१५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासनाला अशी नियमावली तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार २ नोव्हेंबर २०१५ रोजी शासन निर्णय जारी झाला, परंतु अनेक बाबी अद्याप अस्पष्ट आहेत. परिणामी, पालकांच्या संमतीने मुलांना प्रवेश देणाऱ्या वसतिगृहांवरही कारवाई होत आहे.ही संघटना शासकीय निकषांचे पालन करणाऱ्या संस्थांना संरक्षण देण्यासाठी, पारदर्शक कार्यपद्धती राबवण्यासाठी आणि बालकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी कार्यरत राहणार आहे.

———————————
चौकट:

खाजगी संस्था वसतिगृह संघटना सरकारदरबारी एक संयुक्त, जबाबदार आणि कायदेशीर आवाज बनून उभे राहणार आहे. पारदर्शक कार्यपद्धती, बालकांच्या हक्कांचे रक्षण, आणि प्रामाणिक संस्था टिकवण्यासाठी सामूहिक पाठपुरावा हे संघटनेचे प्राथमिक उद्दिष्ट राहील.

महेश निंबाळकर- अध्यक्ष- खाजगी संस्था वसतिगृह संघटना
———————
खऱ्या अर्थाने बालकांच्या संरक्षणासाठी आणि प्रामाणिक संस्थांच्या हक्कांसाठी ही संघटना लढा देणार आहे. वसतिगृह क्षेत्रात पारदर्शकता, सुसूत्रता आणि विश्वास निर्माण करण्यासाठी राज्यस्तरावर ही संघटना महत्त्वाची भूमिका बजावेल.

दयानंद कुबल, कार्याध्यक्ष- खाजगी संस्था वसतिगृह संघटना
——————————————–
महाराष्ट्रातील शकेडो खाजगी वसतिगृहे चालवणाऱ्या संस्थांच्या सामूहिक प्रयत्नातून या संघटनेची निर्मिती झाली असून काल झालेल्या बैठकीत राज्यस्तरीय पदाधिकारांच्या नावांची घोषणा पुणे येथे करण्यात आली.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments