महाबळेश्वर(नितीन गायकवाड) : ग्रामपंचायत देवळीमुरा (ता. महाबळेश्वर) हद्दीतील शासनमान्य घरकुल योजनेंतर्गत सन 1995 साली मागासवर्गीयांसाठी मंजूर करण्यात आलेल्या स.नं. १९९ या भूखंडावर अतिक्रमण व उत्खनन झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी तहसीलदार महाबळेश्वर यांच्याकडे निवेदन सादर करून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.
सदर जमीन ही शासनाकडून मिळवून घेत २० गुंठ्यांवर मंजूर घरकुल बांधण्यात आले होते. ही मालमत्ता ग्रामपंचायतीच्या ताब्यात असून त्यावर चार घरकुल उभारण्यात आली होती. परंतु अलीकडेच काही धनदांडग्या व्यक्तींनी ही जागा खरेदी केल्याचा दावा करत बेकायदेशीरपणे उत्खनन करत घरकुले पाडल्याची माहिती निवेदनात नमूद करण्यात आली आहे. या कृतीमुळे फक्त घरकुलच नव्हे तर ग्रामपंचायत देवळीमुरा च्या मालकी हक्काचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शासनाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या सुविधांवरही गदा आली आहे.
ग्रामीण भागातील मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी शासनाने उभारलेल्या योजना अशा प्रकारे जमीनदोस्त होणे ही गंभीर बाब असून प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून अतिक्रमण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी आणि नुकसानग्रस्त कुटुंबांना न्याय द्यावा, अशी मागणी सरपंच विजय ढेबे यांच्या वतीने करण्यात आली आहे.