मुंबई : मुंबई दक्षिण मध्यचे महायुतीचे उमेदवार राहुल रमेश शेवाळे यांनी सोमवारी दुपारी अडीच वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार तमिळ सेल्वन, पत्नी सौ कामिनी राहुल शेवाळे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी फोर्ट परिसरातील जीपीओ ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी नामांकन रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीमध्ये मुख्यमंत्र्यांसह शिवसेना नेते गजानन किर्तीकर, पालकमंत्री दीपक केसरकर, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश शिरवाडकर, मनसे नेते संदीप देशपांडे, आर पी आय जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कासारे, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार तमिळ सेल्वन, आरपीआय युवा नेते सचिन मोहिते आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
सोमवारी सकाळी राहुल शेवाळे यांनी आपल्या मानखुर्द येथील निवासस्थानी आई वडिलांच्या स्मृतीला वंदन करून आशीर्वाद घेतले. त्यानंतर मानखुर्द येथील नर्मदेश्वर मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले. रामनवमीच्या पूर्वसंध्येला अयोध्येच्या राम मंदिरातील संतांनी अभिमंत्रित करून दिलेल्या धनुष्यबाणाची यावेळी पूजा करण्यात आली. त्यानंतर दुपारी 11.30 च्या दरम्यान राहुल शेवाळे यांनी प्रभादेवीच्या सिध्दीविनायक मंदिरात गणरायाचे दर्शन घेतले. छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील शिवरायांच्या पुतळ्याला पुष अर्पण करून वंदन केले. तसेच येथील वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन केले. चैत्यभूमी येथे महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आणि स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे स्वातंत्रवीर सावरकर यांना अभिवादन केले. माहिमच्या दर्ग्याला जाऊन मुस्लिम बांधवांसह चादर चढवली. यानंतर दुपारी 12.30 च्या दरम्यान राहुल शेवाळे जी पी ओ, फोर्ट येथे पोहोचले. येथून सुरू झालेल्या पदयात्रेत शेवाळे सामील झाले. या पदयात्रेत मुख्यमंत्र्यांसह महायुतीचे प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
नामांकन रॅलीमध्ये स्थानिकांचा उत्साह
राहुल शेवाळे यांच्या नामांकन रॅली मध्ये दक्षिण मध्य मुंबईतील कोळी बांधव, पंजाबी बांधव, तमिळ बांधव पारंपारिक वेशभूषेत सामील झाले होते. त्यांनी वाद्यांच्या तालावर ठेका धरला. या स्थानिकांच्या उत्साहामुळे ही नामांकन रॅली अविस्मरणीय ठरली.