तळमावले/वार्ताहर : पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार देण्यात येतात. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील सर्व साहित्य प्रकारांना सन्मानपत्र आणि ग्रंथ देवून गौरविण्यात येते. सदर पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून आतापर्यंत सुमारे 50 साहित्यिकांना पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. तरी सदर पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष शेतीमित्र संदीप डाकवे यांनी केले आहे.
सन 2024 व 2025 या कालावधीत प्रकाशित झालेली पुस्तके यासाठी ग्राह्य धरल्या जाणार आहेत. यामध्ये कथासंग्रह, कवितासंग्रह, चारोळीसंग्रह, कादंबरी, समीक्षा, वैचारिक लेखन, चरित्र, आत्मचरित्र व संकीर्ण विभागातील साहित्य कलाकृतींचा समावेश केला जाईल. पुरस्कारासाठी पुस्तकाच्या तीन प्रती, दोन आयडेंटी फोटो, अल्प परिचय पाठवावा. पाठवलेल्या पुस्तकावर कोणत्याही प्रकारचा मजूकर लिहू नये.
पुरस्कारासाठी अधिकृतरित्या आलेल्या पुस्तकांची पुरस्कारांसाठी निवड केली जाणार आहे. स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार निवडीसाठी स्वतंत्र परीक्षक समिती नेमली आहे. विशेष म्हणजे या पुरस्कारासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. यामध्ये भाग घेण्यासाठी पुस्तकाच्या तीन प्रती पाठवाव्यात. या निमित्ताने संग्रहित झालेल्या तीन पुस्तकांपैकी एक प्रत स्व.राजाराम डाकवे (तात्या) सार्वजनिक वाचनालय, दुसरी प्रत ‘पुस्तकांचं झाड’ या उपक्रमासाठी तर तिसरी प्रत वाचनालयाला भेट देण्यात येणार आहे.
स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने यापूर्वी वाचन चळवळ समृध्द करण्यासाठी पुस्तकांचं झाड, दिवाळी अंक स्पर्धा, निबंध स्पर्धा, उत्कृष्ट वार्तांकन स्पर्धा, भित्ती चित्र काव्य स्पर्धा, प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशन, महिलांना प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप, कॅलिग्राफीतून अक्षरसंस्कार, वाचनालयास दिवाळी अंक भेट, पुस्तक भेट अभियान, पुस्तकांनी मान्यवरांचे स्वागत इ.उपक्रम राबवले आहेत. याशिवाय स्पंदन एक्सप्रेस मासिकाच्या माध्यमातून लिहण्यासाठी वाचकांना एक व्यासपीठही निर्माण केले आहे.
तरी स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कारासाठी गुरुवार दि.31 जुलै, 2025 पर्यंत ‘राजनंदा प्राईड अपार्टमेंट’, फ्लॅट नं.8, होली फॅमिली काॅन्व्हेंट स्कुलच्या पाठीमागे, सैदापूर विद्यानगर, ता.कराड, जि.सातारा. 415124 येथे पोस्टाने अथवा कुरियरने आपल्या पुस्तके पाठवावेत असे आवाहन स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक/अध्यक्ष, शेतीमित्र संदीप डाकवे यांनी केले आहे.
स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन
RELATED ARTICLES