तुळसण : निनाई देवी विद्यालयात महाराजस्व अभियान 2025 अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना दाखले वाटप, इयत्ता आठवीच्या नवागत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप तसेच ग्रामदैवत श्री निनाई देवी यांच्या प्रतिमेच्या अनावरणाचा समावेश होता.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक कल्याण कुलकर्णी, आनंदराव जानुगडे, वैभव जाधव, रघुनाथ पोतदार, जयवंत काटेकर, विठ्ठल काटेकर, संजय साळुंखे उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.
या प्रसंगी बोलताना आनंदराव जानुगडे सर म्हणाले की, “निनाई देवी विद्यालय हे आदर्श विद्यालय आहे. शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी सातत्याने आणि प्रभावीपणे येथे केली जाते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था नेहमीच प्रयत्नशील असते.” त्यांनी पुढे सांगितले की, आज विद्यालयात ग्रामदैवत श्री निनाई देवी यांच्या प्रतिमेचे अनावरण विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आल्याचा क्षण विशेष अभिमानास्पद आहे. आजच्या काळात संस्कार हे अत्यंत महत्त्वाचे असून विद्यालय अशा संस्कारक्षम पिढी घडविण्याचे कार्य करत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ पोतदार यांनी केले तर वैभव जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.