प्रतिनिधी : मुंबई येथे मुंबई महापालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडणारे अत्रेच होते. महाराष्ट्र कृती समिती स्थापनेत अत्रेचा पुढाकार होता. महाराष्ट्रासाठीच जगण्या मरण्याची भावना मराठी माणसांच्यात चेतवत ठेवण्याचे काम अत्रे व त्यांच्या लेखणीने समर्थपणे केले. अत्रे यांच्या वाणी व लेखणीने लढ्यात दिलेले योगदान फार प्रभावी व अमूल्य आहे. अत्रे यांचे विविध पैलू असलेले व्यक्तिमत्त्व प्रसिद्ध आहेच.मुंबईसह अपेक्षित “महाराष्ट्र’ राज्य नावास आकाराला येण्यात अत्रेचा वाटा मोठा आहे. विविध मार्गानी अत्रे यांनी संयुक् महाराष्ट्र निर्मितीची गाथा लोकमनात रुजविली त्यामुळे हा लढा यशस्वी झाला. मुंबई मिळवण्यासाठी मराठी माणसांनी जो त्याग केला लढा उभारला ते सध्याची मुंबईची परिस्थिती पाहता भविष्यात मुंबईवर मराठी माणसांचा सर्वाधिकार राहील काय याचे आत्मपरीक्षण आजच्या महाराष्ट्रातील मराठी राज्यकर्त्यांनी करायला पाहिजे. निरक्षर कवयत्री बहिणाबाई यांच्या कविता अत्रे यांनी अधाशासारख्या वाचल्या आणि त्यांना आणि त्यांचे साहित्य महाराष्ट्रापुढे आणले. अत्रेसाहेब हे महाराष्ट्राचे सर्वव्यापी बलदंड व्यक्तिमत्व होते. अशी भावना कुटुंब रंगलय काव्यात चे विसुभाऊ बापट, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे आणि शरद बर्डे यांनी व्यक्त केली.
साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांच्या ५६ व्या पुण्यस्मरणार्थ मुंबई वरळीनाका येथील आचार्य अत्रे चौकात त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यापुढे अत्रेसाहेबांना अभिप्रेत असे अनेक उपक्रम राबविण्यासाठी यापुढे आचार्य अत्रे समिती महाराष्ट्र राज्य या नावाची संस्था स्थापन होत असल्याची घोषणा आरती सदावर्ते-पुरंदरे यांनी केली. कार्यक्रमाला ज्येष्ठ निवेदिका मधू मंजिरी गटणे, श्रीकांत मयेकर, श्रीमती सविता झेंडे या उपस्थित होत्या.
आचार्य अत्रे यांना अभिवादन वरळी चौकात पुण्यतिथी साजरी
RELATED ARTICLES