तळमावले/वार्ताहर : माण तालुक्यातील गोंदवले खुर्द येथील रुद्रप्रताप भारती अमोल पोळ याने इयत्ता नववीच्या सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत राज्यात पहिला क्रमांक मिळवत दैदीप्यमान यश मिळवले. सर्वसाधारण प्रवर्गातून तो देशात सतराव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. याबद्दल रुद्रप्रतापच्या घरी जावून स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट ने त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली.
स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट आणि जाधव परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशस्तीपत्र, शाल, बुके व पेढे देवून रुद्रप्रतापचे कौतुक करण्यात आले. या कौतुक सोहळयाप्रसंगी ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष संदीप डाकवे, शिवम असोसिएट्सचे गुलाब जाधव (फौजी), सचिव रेश्मा डाकवे, पुनम जाधव, स्पंदन डाकवे, सांची डाकवे, रुद्रप्रतापचे वडील अमोल पोळ, आई भारती पोळ आणि बहीण ओवी पोळ उपस्थित होते.
रुद्रप्रताप हा कराड येथील होली फॅमिली कॉन्व्हेंट हायस्कूलचा विद्यार्थी असून त्याने मानेगांव (ता.पाटण) येथील आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेची तयारी केली. सहावीच्या प्रवेश परीक्षेत मनासारखे गुण न मिळाल्याने रुद्रप्रताप याने पुन्हा एकदा नेटाने प्रयत्न केले. त्याच कष्टाचे फळ म्हणून तो घवघवीत यशाला गवसणी घालू शकला. रुद्रप्रताप यांचे वडील अमोल पोळ हे गोंदवले खुर्दचे उपसरपंच आहेत तर आई भारती पोळ या गृहिणी आहेत.
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रभागी असलेल्या स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टने यापूर्वी ज्ञानाची शिदोरी, स्व.राजाराम डाकवे (तात्या) पारितोषिक, माणुसकीच्या वहया, एक वही एक पेन, गणवेश वाटप, शाळेला तक्ते वितरण, विनामुल्य बोलक्या भिंती, महापुरुषांच्या प्रतिमांचे वितरण, गुणवंत विद्यार्थ्यांचा घरी जावून सत्कार, स्वाध्यायमाला वितरण, दिव्यांग मुलांना चित्रकला साहित्य वाटप असे शैक्षणिक चळवळीला गती देणारे उपक्रम राबवले आहेत.
रुद्रप्रताप पोळ’च्या पाठीवर ‘स्पंदन’ ची कौतुकाची थाप
RELATED ARTICLES