प्रतिनिधी : दलित समाजाच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या ‘दलित पँथर’ या संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बुद्धभूषण कुंदन गोटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दलित पॅंथरच्या पक्षश्रेष्ठी मलिका नामदेव ढसाळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करतांना मलिका नामदेव ढसाळ यांनी ही नव्या संघर्षाची तयारी असल्याचे सांगतानाच दलित पँथर आज पन्नास वर्षांहून जास्त काळ झाला तरीही पँथरचे गारुड जनमानसात कायम असल्याचे सांगितले . त्यामुळे आजही आवेशात लढणारे पँथर्स आहेत . कारण दलित पँथर हा सकारात्मक विचार असून हे एक हत्यार आहे आणि ज्वालाही आहे . ही क्रांतीची ज्वाला बुद्धभूषण कुंदन गोटे विझू देणार नाही हा विश्वासही मलिका नामदेव ढसाळ यांनी व्यक्त केला .
दलित पँथर संघटने मुंबई अंधेरी येथील सम्राट अशोक हॉल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी भवन चारबंगला, अंधेरी येथे आयोजित कार्यक्रमात धडाडीचे युवा नेते बुद्धभूषण कुंदन गोटे यांना अधिकृतपणे नियुक्तीपत्र सुपूर्द करण्यात आले. दलित पँथर चे मुख्य प्रवक्ते संदीप जाधव यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पद नियुक्तीची घोषणा केली तसेच मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले . यावेळी मलिका नामदेव ढसाळ’ यांनी त्यांच्या नियुक्तीचे स्वागत करत, “गोटे यांचा गेल्या अनेक वर्षाचा सामाजिक कार्याचा अनुभव संघटनेच्या उन्नतीस उपयोगी ठरेल,” असे मत व्यक्त केले. गेल्या पाच दशकांपासून दलितांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचार विरोधात झगडणाऱ्या या संघटनेला देशभरात वेगळी ओळख मिळाली आहे. अशा संघटनेच्या नेतृत्वाची धुरा तरुण तडफदार मा.बुद्धभूषण कुंदन गोटे यांच्याकडे सोपवण्यात आल्याने संघटनेच्या आगामी कार्याला नवे बळ मिळणार आहे. असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. दलित पॅंथरचे मुंबई, महाराष्ट्रातील पँथर, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना ऍड . नितीन खैरे यांनी सांगिलते की , दलित पँथर इथल्या प्रस्थापित समाज व्यवस्थेला भगदाड पडण्याची ताकद असणारी शक्ती आहे . तसेच सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी लढा देणारी संघटना असल्याने बुद्धभूषण कुंदन गोटे यांच्याकडे या लढाऊ संघटनेचे नेतृत्व आल्याने ही संघटना मोठ्या ताकदीने उभी राहील हा विश्वास व्यक्त केला .
यावेळी सोलापूर येथील पँथर रायप्पा तसेच संतोष भालेराव आणि कविता मगरे यांनीही आपले मनोगत व्यक्त करत दलित पँथरची आजही अशी गरज आहे हे सांगत ‘दलित पँथर’चे नवे राष्ट्रीय अध्यक्ष बुद्धभूषण कुंदन गोटे यांना शुभेच्छा दिल्यात . या कार्यक्रमाला रिपब्लिकन चळवळीचे नेते नितीनभाऊ मोरे हे आवर्जून उपस्थित होते आणि त्यांनीही दलित पँथरचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष बुद्धभूषण कुंदन गोटे यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना समाजावरील अन्याय , अत्याचाराविरुद्ध आपण खांद्याला खांदा देऊन लढा देऊ असे स्पष्ट केले . यावेळी दलित पँथरचे सदस्य जनार्धन धायमुक्ते, कविता ताई मगरे पारापा डवरे, भुजंग साळवी, संतोष भालेराव, दीपक साळवी, कय्युम सय्यद, किरण मांदळे, ॲड नितीन खैरे, युवा मित्र परिवार अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते .
* दलित पँथरची पाच धोरणात्मक उद्दिष्टे जाहीर
नव्या कार्यकारिणीत संघटनेने पुढील काळात अंमलात आणावयाचे पाच महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत
1. शिक्षणात समान संधी व दर्जा : सर्व स्तरांवरील दलित विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, शिष्यवृत्ती आणि विशेष शैक्षणिक सुविधा देणे.
2. कठोर कायदा अंमलबजावणी : SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व पोलिसांची जबाबदारी निश्चित करणे.
3. अर्थसहाय्य व रोजगार, दलित उद्योजकांना शासकीय योजनांचा लाभ देणे, तसेच आर्थिक मदत पुरविणे.
4. खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करणे,शिक्षण व सरकारी नोकऱ्यांप्रमाणेच खासगी क्षेत्रातही आरक्षण लागू करणे.
5. सामाजिक सन्मान व सुरक्षितता, दलित वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा, सामाजिक समतेसाठी जनजागृती आणि सन्मानपूर्वक जीवनाचा अधिकार
नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून संघटनेला नवसंजीवनी मिळेल आणि दलित समाजाच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडली जाईल, अशी अपेक्षा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.