कराड(विजया माने) : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कर्मभूमीतील स्व. सौ. वेणूताई यशवंतराव चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड हे कराडसह पाटण, कडेगाव, खटाव, शिराळा या तालुक्यांतील गोरगरीब रुग्णांसाठी उपचाराचे केंद्रबिंदू ठरत आहे. मात्र, येथे अद्याप २०० बेड, ट्रॉमा केअर सेंटर, एमआरआय सुविधा तसेच तज्ज्ञ डॉक्टर व आवश्यक वैद्यकीय कर्मचारी अपुरे असल्याने रुग्णांचे हाल सुरूच आहेत.
प्रहार जनशक्ती पक्षाने २०१५ पासून या मागण्यांसाठी सातत्याने निवेदने, आंदोलने व उपोषणांच्या माध्यमातून आवाज उठवला आहे. याबाबत आरोग्यमंत्री मा. ना. प्रकाश आबिटकर यांच्याकडे निवेदन देऊन पुढील मागण्या तत्काळ पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे:
- उपजिल्हा रुग्णालयास २०० बेडची मंजुरी
- ट्रॉमा केअर सेंटर व एमआरआय मशीन
- मंजूर तज्ज्ञ डॉक्टर व सर्व वैद्यकीय कर्मचारी तत्काळ भरावेत
- सन 2022 मध्ये कराडसाठी मंजूर झालेली कैथलॅब सातारच्या ऐवजी पुन्हा कराड येथे स्थापन करावी
गौरवाची बाब म्हणजे, उपजिल्हा रुग्णालयातील प्रसूती विभागाने देशपातळीवर नावलौकिक मिळवला आहे. मात्र, अपघाती रुग्णांसाठी त्वरित सेवा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाने ही मागणी करताना, “स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाशी साजेसा वैद्यकीय दर्जा व सेवा या रुग्णालयात यावी. राज्य सरकारने हे रुग्णालय ‘स्मार्ट हॉस्पिटल’ म्हणून विकसित करावे व स्वतः दत्तक घ्यावे,” अशी विनंती केली आहे.