सातारा(अजित जगताप) : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांच्या पत्नीला वर्षभर निशुल्क पास देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला. या निर्णयाचे सातारा जिल्ह्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी एकमेकांना पेढे भरून आनंद उत्सव साजरा केला. सदर मागणीसाठी सातारा येथून प्रसिद्ध होणाऱ्या दैनिक प्रतिनिधी यांनी पाठपुरावा केला . त्याबद्दल वरिष्ठ पत्रकार अजित जगताप यांचेही प्रतिनिधिक स्वरूपात कौतुक केले.
याबाबत माहिती अशी की, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना दोन महिने, त्यानंतर सहा महिने आणि नऊ महिने प्रवासासाठी निशुल्क पास देण्यात येत होते. परंतु उन्हाळ्यामध्ये तीन महिने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी. सेवेचा मोफत प्रवास करता येत नव्हता. त्यामुळे वार्षिक यात्रा, लग्नसराई व आजारपण यासाठी सेवानिवृत्त एस.टी. कर्मचारी व त्यांच्या पत्नीला एस.टी.चा प्रवास करताना तिकिटाचे दर द्यावे लागत होते. याबाबत महाबळेश्वर आगारातील सेवानिवृत्त वाहतूक नियंत्रक महादेव धनवडे व सातारा आगारातील प्रवीण जाधव यांच्यासह अनेक सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांनी वर्षभर पास देण्याची मागणी केली होती. त्याबाबत दैनिक सांजवात वृत्तपत्रांमध्ये व इलेक्ट्रॉनिक माध्यमातून याबाबत आवाज उठवण्यात आला होता. याची गंभीर दखल घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सदाशिव खोत, माजी खासदार आनंदराव अडसूळ व मान्यवरांनी याबाबत तातडीने निर्णय घेतला . महाराष्ट्र राज्यातील एस.टी. कर्मचाऱ्यांना वर्षभर निशुल्क प्रवासासाठी पास देण्याची घोषणा केली. तसेच कर्मचाऱ्यांना मूळ वेतनावर ५३ टक्के एवढा महागाई भत्ता देण्याचाही निर्णय घेतला. सदरचा निर्णय घेण्यासाठी एस.टी. कर्मचारी संघटनेने सुद्धा पाठपुरावा केला होता.
त्याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांना एक कोटी रुपयांचा अपघाती विमा कवच देण्यात येणार असल्यामुळे खऱ्या अर्थाने एस.टी. कर्मचाऱ्यांसाठी ही सुसाट योजना गतिमान झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होणार आहे. तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ मिळणार असल्याने यंदाच्या वर्षी नवीन मोफत प्रवास पास वर्षभराच्या कालावधीसाठी मिळणार आहे . सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. ही मागणी लावून धरण्यासाठी सर्वांचा सहकार्य लाभले त्यांचे आभार मानण्यात आले.
सातारा जिल्ह्यातील सेवानिवृत्त कर्मचारी महादेव धनावडे, संजय भुजबळ, शामराव धनावडे, पोपट भोसले, सुरेश पाटील ,हनुमंत अवघडे, गजानन काळे, राजेंद्र रासकर, प्रकाश खंडजोडे, आणि प्रवीण जाधव, शरद शिंदे तसेच इतर सातारा जिल्ह्यातील आगारामधून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी आनंद उत्सव साजरा केला. संबंधित महायुतीचे मंत्री व लोकप्रतिनिधी यांचेही मनापासून आभार मानले.
______________________________
फोटो– सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना वर्षभर पास मिळाल्याचा आनंद पेढे वाटून साजरा करताना व प्रतिनिधित्विक स्वरूपात वरिष्ठ पत्रकाराचा सत्कार करण्यात आला…. (छाया– निनाद जगताप ,सातारा)