प्रतिनिधी : समाजसेवा, वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात गेल्या ११४ वर्षांपासून कार्यरत असलेल्या “द सोशल सर्व्हिस लीग” या प्रतिष्ठित संस्थेच्या समाजकार्य प्रशिक्षण वर्गाने यंदा शतकोत्तर वर्षात प्रवेश केला आहे. १९२४ साली संस्थेचे तत्कालीन सचिव आणि सुप्रसिद्ध कामगार नेते ना. म. जोशी यांनी सुरू केलेल्या या सहा महिन्यांच्या समाजकार्य प्रशिक्षण वर्गास यावर्षी १०० वर्षे पूर्ण झाली.
या ऐतिहासिक टप्प्यानंतर “एन. एम. जोशी डिप्लोमा इन सोशल वर्क अॅण्ड कम्युनिटी मेटल हेल्थ” हा एक वर्षाचा अभिनव डिप्लोमा अभ्यासक्रम जुलै २०२५ पासून सुरू होत आहे. समाजकार्य आणि मानसिक आरोग्य या दोन अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रांचा समन्वय साधणारा हा अभ्यासक्रम नव्या पिढीतील समाजसेवकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
अभ्यासक्रमाविषयी अधिक माहितीसाठी इच्छुकांनी प्रा. प्राजक्ता सावंत (अभ्यासक्रम समन्वयक) यांच्याशी ९८९२९७२३३८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे विश्वस्त प्रा. हेमंत सुधाकर सामंत यांनी केले आहे.
शतकपूर्तीच्या वाटचालीतून पुढे जात, “द सोशल सर्व्हिस लीग” ही संस्था सामाजिक परिवर्तनासाठी अधिक सक्षम कार्यकर्ते घडवण्याचे कार्य निष्ठेने करीत आहे.