मुंबई(रमेश औताडे) : नालेसफाई होत असताना कामगारांच्या सुरक्षा विषयी कंत्राटदार मनमानी कारभार करत असल्याने, कामगारांचा मृत्यू होऊ शकतो. अनेक कामगार असेच मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे सरकारने व पालिकेने या प्रकरणी कारवाई करावी. अशी मागणी पुढे येत आहे.
घाटकोपर पश्चिम, गंगावाडी परिसरात सध्या सुरू असलेल्या नाले सफाई कामांदरम्यान जे.सी.बी. यंत्राच्या फाळक्यावर कामगार उभा असल्याचे धक्कादायक दृश्य समोर आले आहे. या प्रकाराचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल होत असून, कामगार सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेस मुंबई अध्यक्ष ॲड अमोल मातेले यांनी पालिकेला पत्र पाठवत कंत्राटदाराच्या मनमानी कारभाराची चौकशी केली आहे.
“ही नाले सफाई नाही, तर कामगारांच्या मृत्यूला खुले आमंत्रण आहे! जे.सी.बी.सारख्या धोकादायक यंत्रावर माणूस उभा असणे ही केवळ निष्काळजीपणा नव्हे, तर अमानुषतेची परिसीमा आहे.”
महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे आणि कंत्राटदारांच्या बेजबाबदार पद्धतीमुळे कामगारांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणती उपाययोजना केली जात आहे? कोणती सुरक्षा साधने कामगारांना उपलब्ध करून दिली गेली आहेत? असा सवाल राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला असून तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
संबंधित अधिकाऱ्यांवर आणि कंत्राटदारावर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी.भविष्यात असे प्रकार घडू नयेत म्हणून कडक उपाययोजना करण्यात याव्यात.यापुढे अशा घटनांमुळे कुणाचा जीव गेल्यास, त्याची नैतिक व कायदेशीर जबाबदारी महानगरपालिका व कंत्राटदाराची असेल. कामगार हे आपल्या शहराच्या विकासाचा पाया आहेत. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी समाज आणि प्रशासनाने तितक्याच गांभीर्याने घेतली पाहिजे.