Sunday, July 27, 2025
घरमहाराष्ट्रकोविडसंदर्भात नागरिकांनी घाबरू नये; काळजी घ्यावी - सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आवाहन

कोविडसंदर्भात नागरिकांनी घाबरू नये; काळजी घ्यावी – सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आवाहन

मुंबई : राज्यात सध्या काही रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येत असून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कोविड तपासणी व उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

कोविड हा आजार विषाणूमुळे होणारा आजार आहे. सद्यस्थितीत कोविडसाठी राज्यात आयएलआय (इन्फ्लूएंझा सारखा आजार) आणि एसएआरआय (गंभीर तीव्र श्वसन संसर्ग) सर्वेक्षण चालू आहे. त्या सर्वेक्षणामध्ये अशा रुग्णांची कोविडसाठी चाचणी केली जाते. रुग्ण कोविड पॉझीटीव आढळल्यानंतर नियमित उपचार केले जात आहेत. राज्यात सध्या कोविड केसेस तुरळक आहेत.

जानेवारी 2025 पासून 12 हजार 11 रुग्णांची कोविड चाचणी केली असून त्यापैकी 873 पॉझीटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून आतापर्यंत 369 रुग्ण बरे झाले आहेत. याबाबत आरोग्य आरोग्य विभागाने जाहीर केलेली माहिती :

दि.02 जून 2025 रोजी पॉझीटीव्ह रुग्ण 59 (मुंबई-20, ठाणे-4, पुणे-1, पुणे मनपा-17, पिंपरी चिंचवड मनपा – 2, सातारा – 2, कोल्हापूर मनपा – 2, सांगली मनपा – 1, छत्रपती संभाजीनगर – 1, छत्रपती संभाजीनगर मनपा – 7, अकोला मनपा – 2)

2 जून 2025 रोजी सक्रिय असलेले रुग्ण 494

माहे जानेवारी 2025 पासून मुंबई मधील एकूण रुग्ण संख्या – 483 (जानेवारी – 1, फेब्रुवारी 1, मार्च- 0, एप्रिल- 4, मे – 477)

निदान झालेल्या सर्व रुग्णांत सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत. जानेवारी 2025 पासून आजपर्यंत सहव्याधीने ग्रस्त असलेले 9 व इतर 1 असे एकूण 10 रुग्ण दगावले आहेत. यापैकी एका रुग्णास नेफ्रोटिक सिंड्रोम सह हायपोकॅल्सिमिक सीझर होते व दुसऱ्या रुग्णास कर्करोग होता. तिसऱ्या रुग्णास ब्रेन स्ट्रोक झाला होता आणि फिट येत होती. चौथ्या रुग्णास डायबेटिक किटोएसिडोसिस आजार होता. पाचव्या रुग्णास आयएलडी होता. सहाव्या रुग्णास डायबेटीस होता व 2014 पासून अर्धांगवायू झालेला होता. सातव्या रुग्णास सीवीअर एआरडीएस विथ डायलेटेड एओटिक रीगर्जिटेशन हा आजार होता. आठव्या रुग्णास मधुमेह आणि नवव्या रुग्णास मधुमेह व उच्च रक्तदाब होता व इतरमध्ये 47 वर्षीय महिला असून, महिलेस ताप आणि धाप लागणे ही लक्षणे होती.

कोविड रुग्णांची तुरळक वाढ फक्त महाराष्ट्रात नव्हे, तर इतर राज्यात तसेच काही इतर देशात देखील दिसून येत आहे. फ्लूसदृश्य आजार व एसएआरआय (तीव्र श्वसन दाह असलेले रुग्ण) यांचे आरोग्य विभागामार्फत नियमित सर्वेक्षण सुरू आहे. तसेच तीव्र श्वसनदाह असलेल्या सर्व रुग्णांचे कोविड-19 या आजारासाठी आरटीपीसीआर चाचणी करण्यात येते. तसेच फ्लू-सदृश आजार असलेल्या रुग्णांपैकी 5 % रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे. सर्व आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आलेले नमुने संपूर्ण जिनोम सिक्वेन्सिंगसाठी एन आय व्ही, पुणे व बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे व राज्यातील इतर प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येतात.

जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा यांचे स्तरावर कोविड 19 साथरोग संदर्भात पूर्वतयारीचा आढावा विभागीय स्तरावर घेण्यात येत असून त्यामध्ये सर्व यंत्रणेला रुग्णालये सुसज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर, आरटीपीसीआर चाचणी, ऑक्सीजन बेड, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर बेड व ऑक्सिजन उपलब्धतेबाबत सर्व तयारी ठेवण्यासंदर्भात जिल्ह्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तथापि काळजी घ्यावी.

खोकताना व शिंकताना रूमालाचा वापर करावा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. सर्दी, ताप, खोकला, घसादुखी, धाप लागणे इत्यादी लक्षणे असल्यास त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयास संपर्क साधून र्मोफत उपचार व आवश्यक तपासण्या करून घ्याव्यात. अशा प्रकारची लक्षणे, इतर आजाराने व्याधीग्रस्त लोकांमध्ये आढळून आल्यास विशेष दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments