मुंबई, : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चर्चगेट रेल्वे स्थानक परिसरात आज “प्लास्टिक टाळा, कापडी पिशवी वापरा” या विषयावर जोरदार पथनाट्य सादर करण्यात आले. ठाणे येथील युवा अभिनेता कुणाल जाधव आणि त्यांच्या टीमने सादर केलेल्या या सादरीकरणाने प्रवाशांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
रेल्वे स्थानकात गाडी दाखल होताच ढोल, डफाच्या आवाजाने प्रवाशांचे लक्ष वेधले गेले. अनेक प्रवाशांनी उत्स्फूर्तपणे पथनाट्य भोवती रिंगण तयार केले. नाट्यादरम्यान संवाद, गीते, आणि कोरसच्या माध्यमातून “पर्यावरण जपा – प्लास्टिक हा भस्मासूर गाडा” असा जागरुकतेचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी, टीमकडून कापडी पिशव्या वाटप करून हसतमुखाने पर्यावरणपूरक जगण्याचा संदेश दिला गेला. उपस्थित प्रवाशांनी उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले.