नवी मुंबई प्रतिनिधी — सध्या महाराष्ट्रात वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे हुंडा प्रथा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे सानपाडा परिसरात अनोख्या बॅनरच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. “हुंडा घेणारा कळवा – ५००० रुपये मिळवा” असा ठळक मजकूर असलेले बॅनर परिसरात ठिकठिकाणी झळकत आहेत.
या उपक्रमाची खासियत म्हणजे हुंडा घेणाऱ्यांविरोधात माहिती देणाऱ्याला रोख रक्कम म्हणून ५,००० रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर आश्वासन या बॅनरद्वारे देण्यात आले आहे. शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णतः गोपनीय ठेवले जाईल.
शिवसेना (उबाठा) गटाच्या सानपाडा विभागातील महिला आघाडीच्या अध्यक्षा साधना इंदोरे आणि विभाग प्रमुख बाबाजी इंदोरे यांच्या पुढाकाराने हा समाजप्रबोधनात्मक उपक्रम राबवण्यात आला. या बॅनरवर “ऑपरेशन लग्नकार्य” अंतर्गत कारवाईचे संकेत देत “माणुसकीच्या शत्रूं सांगे युद्ध आमचे सुरु आहे” अशी ठाम भूमिका मांडण्यात आली आहे.
बाबाजी इंदोरे यांनी सांगितले की, “या उपक्रमाचा हेतू कोणालाही प्रलोभन देण्याचा नाही. आमचा उद्देश केवळ समाजात अजूनही चालू असलेल्या हुंडा प्रथेविरोधात जागृती घडवण्याचा आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणातून प्रेरणा घेऊन हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी आम्ही समाजाच्या पाठिंब्याची अपेक्षा ठेवतो.”
या उपक्रमामुळे स्थानिक पातळीवर समाजात सकारात्मक चळवळ सुरू झाल्याचे चित्र आहे. महिलांवरील अन्यायाविरोधात असा थेट आणि स्पष्ट पवित्रा घेणाऱ्या मोहिमांचे नागरिकांकडूनही स्वागत होत आहे. बॅनरवर दिलेल्या संपर्क क्रमांकावर नागरिकांनी माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.