प्रतिनिधी : आज मुंबई येथील पोलीस महासंचालक कार्यालयात महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालिका मा. श्रीमती रश्मी शुक्ला यांची भेट माजी खासदार निलेश राणे यांनी घेतली. आगामी ईद सण ६-७ जून २०२५ रोजी देशभरात साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात गोमातेची तस्करी व कतल होण्याची शक्यता असल्याने, गोहत्या रोखण्यासाठी पोलिसांना योग्य ते निर्देश जारी करण्याची विनंती त्यांनी केली.
या भेटीदरम्यान, निलेश राणे यांनी राज्यभरातील जनतेच्या भावना लक्षात घेता गोमातेच्या रक्षणासाठी प्रभावी पावले उचलण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच, गोपनीय माहितीच्या आधारे कार्यवाही, सीमावर्ती भागांत सतर्कता आणि काटेकोर गस्त वाढवण्याची गरज त्यांनी मांडली.
पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला यांनी देखील या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याचे आश्वासन दिले असून, सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जातील, असे सांगितले.
ही भेट आगामी सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि धार्मिक भावना दुखावू नयेत यासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे.