मुंबई : सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर (ZTCC) संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त एक विशेष सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला. या समारंभात अवयवदान करून इतरांचे प्राण वाचवलेल्या कुटुंबातील सदस्यांचा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
अवयवदान करणाऱ्या कुटुंबांनी समाजात रूढ असलेले गैरसमज, अंधश्रद्धा आणि सामाजिक दबाव झुगारून विज्ञानाधिष्ठित आणि विवेकी निर्णय घेतल्यामुळे अनेकांच्या जीवनात नवसंजीवनी मिळाली आहे. मंत्री आबिटकर यांनी या कुटुंबांचे समाजातील “आयडॉल” म्हणून गौरव करताना त्यांच्या निर्णयाला सलाम केला.
“अलीकडच्या काळात अवयवदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हजारो रुग्ण किडनी, लिव्हर, हृदय अशा अवयवांच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र, प्रत्यक्षात अवयवदानाचं प्रमाण अतिशय कमी आहे. त्यामुळे अवयवदानाविषयी समाजात जागृती आणि विश्वास निर्माण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन मंत्री आबिटकर यांनी केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने अवयवदानाबाबत सकारात्मक विचार आणि समाजात परिवर्तन घडवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले गेले आहे.