मुंबई, २८ मे : मीरा-भाईंदरमधील राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पत्र लिहून संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल जनतेसमोर मांडण्याची मागणी केली आहे.
या पत्रामध्ये सरनाईक यांनी नमूद केले आहे की, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप जैन यांनी त्यांच्या (सरनाईक) विरुद्ध तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख राजू भोईर यांनी भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या विरोधात केलेले आरोप सध्या शहरात चर्चेचा विषय बनले आहेत.
“महायुती सरकारमध्ये सहकार्य करणाऱ्या पक्षांचे वरिष्ठ पदाधिकारी एकमेकांवर गंभीर आरोप करत असतील, तर या गोष्टीची शहानिशा होणे आवश्यक आहे,” असे सरनाईक यांनी पत्रात म्हटले आहे. त्यांनी हा मुद्दा पक्षाच्या व लोकप्रतिनिधींच्या प्रतिमेचा असल्याचे स्पष्ट केले आहे.
या आरोपांची पारदर्शक चौकशी करून अहवाल लवकरात लवकर जनतेसमोर आणावा, जेणेकरून सामान्य नागरिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर होईल, अशी मागणी त्यांनी केली आहे.