प्रतिनिधी : महाराष्ट्रातील चांभार,ढोर,होलार, मेदिगा,मोची अशा विविध जाती उपजातींमध्ये असलेल्या चर्मकार बांधवांचा व्यावसायिक स्तर उंचावण्यासाठी राज्य सरकारने संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळाची स्थापना केलेली आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून या महामंडळात अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ३०० पेक्षा अधिक जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा असल्याने चर्मकार व्यावसायिकांची कामे रखडलेली आहेत.म्हणून या रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात तसेच चर्मकार व्यावसायिकांनी या महामंडळाकडून १०० कोटींपेक्षा अधिक रकमेचे घेतलेले कर्ज माफ करावे अशी जोरदार मागणी राष्ट्रीय चर्मकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी आमदार बाबुराव माने यांनी या महामंडळाकडे केली आहे.
राष्ट्रीय चर्मकार संघाच्या एका शिष्टमंडळाने अलीकडेच महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक गोरडे यांची माजी आमदार बाबुराव माने यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय चर्मकार संघाच्या शिष्टमंडळांने मुंबई कार्यालयात भेट घेतली. त्यावेळी राष्ट्रीय चर्मकार संघाने एक सविस्तर निवेदन व्यवस्थापकीय संचालक गोरडे यांना सादर केले असून त्यात ही मागणी माने यांनी केलेली आहे. एकीकडे राज्य सरकार शेतकऱ्यांची कर्ज माफ करते.उद्योगपतींची करोडो रुपयांची कर्ज माफ केली जात आहेत.दुसरीकडे मात्र काबाडकष्ट करून आपला चर्मउद्योग भरभराटीस आणण्याचा प्रयत्न करणारे चर्मकार व्यावसायिक हे अनेक वर्षांपासून कर्जाच्या विळख्यात सापडलेले आहेत. या व्यवसायिकांची कर्जाच्या या विळख्यातून सुटका करण्यासाठी त्यांनी घेतलेले १०० कोटी रुपयांपेक्षा अधिकचे खर्च राज्य सरकारने तातडीने माफ करावे.आणि या व्यवसायिकांना दिलासा द्यावा अशी मागणीही बाबुराव माने यांनी महामंडळाकडे केलेली आहे.
*सामाजिक-न्याय विभागाने चर्मोद्योगास कर्जे द्यावीत*
राज्य सरकारचा सामाजिक न्याय विभाग हा चांभार, ढोर,होलार, मेदिगा, मोची अशा जाती उपजातींच्या उन्नतीसाठी आहे.या विभागाकडे केंद्र,राज्य सरकारकडून येणारा निधी हा बर्याच वेळा हा अखर्चित राहतो.निधी पडून राहतो. हा निधी वेळच्या वेळी खर्च व्हावा यासाठी या सामाजिक,न्याय विभागामार्फत चर्मकार व्यावसायिकांना कर्ज देण्याबाबत गांभीर्याने विचार व्हावा असेही बाबुराव माने यांनी म्हटले आहे
*चर्मकार व्यावसायिकांची कामे रखडली*
रोहिदास चर्म उद्योग व चर्मकार महामंडळाची मुंबई सह राज्यातल्या विविध भागात कार्यालये आहेत. या कार्यालयांमध्ये अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या ३०० पेक्षा अधिक जागा रिक्त आहेत. आपली व्यवसाय वृद्धी व्हावी यासाठी चर्मकार व्यावसायिक या महामंडळाकडे कर्ज मागणी व इतर मागण्या,तक्रार, विंनती अर्ज सादर करीत आहेत. परंतु या महामंडळात पुरेसे अधिकारी,कर्मचारी नसल्याने चर्मकार व्यावसायिकांची असंख्य कामे रखडली आहेत.याचा गंभीर परिणाम त्यांच्या व्यवसायावर झालेला आहे. म्हणून या रिक्त जागा प्राधान्यक्रमाने,अग्रक्रमाने तातडीने भरण्यात यावा याव्यात असेही बाबुराव माने यांनी म्हटलेले आहे. *चर्मोद्योग प्रकल्पांना एक कोटींपेक्षा अधिक कर्जे द्या*
संत रोहिदास चर्मोद्योग चर्मउद्योग आणि चर्मकार महामंडळ हे चर्मकार व्यावसायिकांना विविध योजना, प्रकल्प यासाठी कर्ज मंजूर करते. परंतु मंजूर झालेल्या पाच, दहा लाखाच्या २५ \५० लाखांच्या कर्जातून अपेक्षित व्यवसाय वृध्दी ही होत नाही. म्हणून या महामंडळाकडून सर्व चर्मोद्योग प्रकल्पांसाठी एक कोटींपेक्षा अधिक कर्ज देण्यात यावी अशी मागणीही बाबुराव माने यांनी केली आहे. सध्या महागाई प्रचंड वाढलेली आहे. चर्मोद्योग व्यावसायासाठी भाड्याच्या जागा किंवा व्यवसायासाठी स्वतःची जागा घेणे हे सध्या प्रचंड महागलेले आहे.या पार्श्वभूमीवर चर्मकार व्यावसायिकांसाठी एक कोटींपेक्षा अधिक कर्ज देण्याची मागणी अत्यंत रास्त असल्याचे बाबुराव माने यांनी म्हटले आहे.
*चर्मकार व्यावसायिकांची कर्जे माफ करा. चर्मोद्योग महामंडळातील रिक्त जागा भरा* रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक गोरडे यांची बाबुराव माने यांनी भेट घेतली.या भेटीत चर्मकार व्यावसायिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.म्हणून अग्रक्रमाने महामंडळातील अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या ३०० रिक्त जागा तातडीने भराव्यात.या भरतीमुळे राज्यभरातील कर्मचाऱ्यांची रखडलेली कामे मार्गी लागतील.तर गेल्या अनेक वर्षात चर्मकार बांधवांना धंद्यातील मंदीसह अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याने चर्मकार व्यावसायिक हे कर्जाच्या विळख्यात सापडलेले आहेत.या व्यावसायिकांचे शेतकरी,उद्योगपतीं प्रमाणे कर्जे माफ करावीत अशी आमची मागणी असल्याचे बाबुराव माने यांनी व्यवस्थापकीय संचालक गोरडे यांना सांगितले. गोरडे यांनी भेटलेल्या शिष्टमंडळात यावेळेस राष्ट्रीय चर्मकार संघाचे प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत गवळी,मुंबईचे माजी अध्यक्ष जगन्नाथ खाडे,राज्य संघटक विजय घासे,मुंबई कार्याध्यक्ष रावण गायकवाड, मुंबई सरचिटणीस गणेश खिलारे,मुंबई उपाध्यक्ष दिपक भोसले,मुंबई उपनगरचे अध्यक्ष अशोक देहरे,जिल्हाध्यक्ष अमर शिंदे,मुंबई सल्लागार दिलीप शिंदे, तालुकाध्यक्ष उत्तम शिखरे,आदींसह राज्याच्या विविध भागातील राष्ट्रीय चर्मकार संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.