Friday, August 22, 2025
घरमहाराष्ट्रमुक्त पत्रकारांना दरमहा ₹१०,००० पेन्शन द्यावी – राष्ट्रवादी कामगार युनियनची मागणी

मुक्त पत्रकारांना दरमहा ₹१०,००० पेन्शन द्यावी – राष्ट्रवादी कामगार युनियनची मागणी

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील मुक्त, ई-पेपर आणि वेब पोर्टलवर कार्यरत पत्रकारांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असून, सरकारने त्यांना दरमहा ₹१०,००० पेन्शन द्यावी, अशी जोरदार मागणी अखिल महाराष्ट्र राष्ट्रवादी जनरल कामगार युनियनचे महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष देसाई यांनी केली आहे.

मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत देसाई बोलत होते. यावेळी युनियनची नवी कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली. यात रमेश औताडे (अध्यक्ष), नरेंद्र घोलप (उपाध्यक्ष), शिरीष वानखेडे (महासचिव), सुरेश गायकवाड (सचिव), अल्पेश म्हात्रे (संघटक चिटणीस), तसेच सदस्य म्हणून सुरेश ढेरे व सुबोध शाक्यरत्न यांचा समावेश आहे.

देसाई म्हणाले, “अनेक अनुभवी, सुशिक्षित पत्रकार सध्या स्वतंत्र स्वरूपात काम करत आहेत. त्यांना ना नियमित नोकऱ्या मिळतात ना कंत्राटी संधी. त्यामुळे अनेकांना वेब पोर्टलसाठी लेखन करून अत्यल्प मानधनावर समाधान मानावे लागत आहे.”

“या पत्रकारांना फक्त ₹५०० ते ₹१,००० पर्यंतच मानधन मिळते, जे त्यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यास अपुरे आहे. त्यामुळे अनेकजण कर्जबाजारी झाले असून, मानसिक तणावात आहेत,” असे त्यांनी सांगितले.

देसाई यांनी पुढे सांगितले की, सरकार जसे सुशिक्षित बेरोजगारांना ₹४,००० भत्ता देते, त्याच धर्तीवर मुक्त पत्रकारांना ₹१०,००० पेन्शन मिळावी. तसेच बांधकाम कामगार, घरेलू कामगार व कंत्राटी कामगारांना ज्या सुविधा मिळतात, त्या पत्रकारांनाही लागू कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.

“सरकारने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि लवकर निर्णय घ्यावा,” असे आवाहनही देसाई यांनी शेवटी केले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments