सातारा(अजित जगताप) : निर्भीड व निस्वार्थी पत्रकारांची परंपरा सुरू करणारी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीमध्ये पहिले ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरु केले. त्या पार्श्वभूमीवर यंदाचा सातार्यातील पत्रकार दिन सोमवारी सकाळी ११.३० वाजता गोडोली येथील सातारा जिल्हा पत्रकार भवनामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थित साजरा केला जाणार आहे.
सातारा जिल्हा पत्रकार भवनात यंदा प्रथमच पत्रकार दिन साजरा होत आहे. त्यामुळे सर्व पत्रकार बांधवांच्या मध्ये उत्साहाचे वातावरण संचारले आहे. नुकत्याच सातारा शहर पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीची निवड झाल्यानंतर पत्रकारांसाठी हा सार्वजनिक रित्या प्रथमच कार्यक्रम होत आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरिष पाटणे भूषवणार आहेत तसेच सातारा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विनोद कुलकर्णी, प्रभारी उपसंचालक माहिती वर्षा पाटोळे, सातारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट हे मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजन सातारा पत्रकार संघ, सातारा जिल्हा पत्रकार संघ, डिजिटल मीडिया परिषद, जिल्हा माहिती कार्यालय, सातारा इलेक्ट्रॉनिक मीडिया सातारा तसेच सर्व संघटनांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असल्याची माहिती सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर भोईटे यांनी दिली.दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन व मान्यवरांचे सत्कार आणि मनोगत व्यक्त करणार आहेत.
पत्रकार दिनासाठी सातारा शहरातील सर्व पत्रकार, छायाचित्रकार यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सातारा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष- उमेश भांबरे, सचिव- गजानन चेणगे, संघटक- अजित जगताप, खजिनदार- अमित वाघमारे व कार्यकारिणी यांनी केले आहे.
——————————————————-
फोटो –