मुंबई : विधानसभा निवडणूकीत महायुती व महाविकास आघाडीतर्फे दिशाहीन, घराणेशाहीचे, सग्यासोयऱ्यांच्या हिताचे सत्ताकारण केले जात असल्याने मतदारांनी यांना पराभूत करावे व “आरक्षणवादी आघाडी ” ला राज्यात सत्ता द्यावी असे आवाहन मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत शुक्रवारी आरक्षणवादी आघाडीची मोट बांधलेल्या नेत्यांनी केले.

रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, ओबीसी बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे तसेच बीआरएसपी चे अध्यक्ष ॲड डॉ सुरेश माने, प्रा जे.डी. तांडेल आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना घटनातज्ञ डॉ सुरेश माने यांनी सरकारवर हल्लाबोल करताना मराठा समाजाला आरक्षण फक्त मोदीच देऊ शकतात.कारण त्यांनी केलेल्या प्रत्येक कामाचे उद्घाटन असो की काहीही ते किती वेळ टिकते हे सर्व देशातील जनतेला माहीत आहे.
आमच्याकडे पैसा नाही पण व्होट बँक आहे. या व्होट बँकेच्या माध्यमातून आम्ही आहोत. आत्तापर्यंत एकत्र आलो नव्हतो म्हणून तुमचे फावले होते. मात्र आता तुमचे काही खरे नाही असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिला.
मराठा विरुद्ध ओबीसी, ओबीसी विरुद्ध आदीवासी, अनुसूचित जाती-जमातीचे उपवर्गीकरण, आदीवासींचे डि लिस्टींग (आदीबासींना गैरआदीवासी ठरविणे), एकसंघ ओबीसींच्या आरक्षण नावाखाली तुकडे करणे, मुस्लीमांचे ५ टक्के शैक्षणिक आरक्षण नाकारने, या सरकारच्या कारभारविरोधात “आरक्षणवादी आघाडी ” सर्व जागांवर निवडणूक लढविणार असे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले.
राज्यातील प्रस्थापित ६ राजकीय पक्षांनी महाराष्ट्राचे अतोनात नुकसान केल्यामुळेच शेतकरी, विद्यार्थी, सरकारी कर्मचारी व लाखो बेरोजगार युवा हे चिंतेत आहेत. महाआघाडी व महायुतीमध्ये घराणेशाहीचे प्रक्षातरांचे आयाराम-गयाराम पर्व सुरु आहे. कोण सेक्यूलर व कोण संघवादी हा जनतेच्या समोरचा प्रश्न आहे ॲड डॉ सुरेश माने यांनी सांगितले. यावेळी आरक्षणवादी आघाडी ने १५ कलमी जाहीरनामा प्रकाशित केला.