प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत हत्या झाली. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच तिसरा आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला. आता या प्रकरणात असलेला चौथ्या आरोपीचीही ओळख पटली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा सर्व घटनाक्रम सांगितला. क्राईम ब्रँचचे डिसीपी दत्ता नलवाडे यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणाची सर्व माहिती दिली.

जीव धोक्यात घालून आरोपींना पकडले
मुंबई पोलिसांनी जीव धोक्यात घालून गुरमेल सिंह आणि धर्मराज कश्यप नाम या दोन आरोपींना घटनास्थळावर पकडले. आरोपींनी गोळीबार केला तेव्हा बाबा सिद्धिकी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत तीन पोलीस कर्मचारी होते. त्यावेळी एपीआय राजेंद्र दाभाडे आणि त्यांच्यासोबतच्या इतर कर्मचाऱ्यांनी धाडस दाखवत दोन आरोपींना पकडले. त्यांच्याकडे शस्त्र असल्याचे माहिती असतानाही पोलिसांनी ही कामगिरी बजावली. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात दोघांना अटक केली आहे. तसेच शिवा कुमार आणि मोहम्मद जासिन अख्तर फरार आहे. त्यांच्या शोधासाठी १५ पथके पाठवण्यात आले आहे.
आरोपींनी सोबत आणला होता मिर्ची स्प्रे
आरोपींकडून दोन पिस्तूल आणि २८ काडतूसे जप्त करण्यात आली आहे. या आरोपींनी आपल्यासोबत मिर्ची स्प्रे आणला होता. आधी आरोपी मिर्ची स्प्रे करणार होते. त्यानंतर गोळीबार करणार होते. परंतु तिसरा आरोपी शिव कुमार याने सरळ गोळीबार सुरु केला. पोलिसांना या प्रकरणात आंतरराष्ट्रीय कट असल्याची शक्यता वाटत आहे. रविवारी कोर्टात पोलिसांनी ही भूमिकासुद्धा मांडली.