सातारा(विजय जाधव) : आधुनिक तंत्रज्ञान, सातत्याने बदत जाणारे शैक्षणिक धोरण,आकृतीबंध, नवीन अभ्यासक्रम समजून घ्यायला हवा. यासाठी पुरक व्यवस्था निर्माण करण्यासाठी शिक्षण संस्थेची तयारी हवी. तर शिक्षक, प्राध्यापकांनी डिजिटल युगाला सामोरे जाण्यासाठी स्वतःला सक्षम करण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी शिक्षण संचालक डॉ वसंत काळपांडे यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेचा १०५ वा वर्धापनदिन सोहळा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधी परिसर येथे संपन्न झाला.यावेळी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला व्हा.चेअरमन ॲड.भगीरथ शिंदे, संघटक डॉ अनिल पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, ॲड . रविंद्र पवार, जे.के.(बापू) जाधव, बाबासाहेब भोस, कायदेशीर सल्लागार ॲड.दिलावर मुल्ला, कर्मवीर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव मस्के, सहसचिव प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे, सहसचिव बंडू पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ.वसंत काळपांडे यांनी बोलताना, इयत्ता ६ वी पासून सायन्स आणि गणित विषय इंग्रजीतून शिकविले पाहिजेत. प्रत्येक विद्यार्थ्यांना आता अपार युनिक नंबर दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून पालकांच्या क्षमता समजून घेतल्यास भविष्यातील शैक्षणिक धोरणा बरोबर मार्गक्रमण करताना अपेक्षित यश प्राप्त होईल,असे सांगून भविष्यात शैक्षणिक धोरण, अंमलबजावणी आणि त्यासाठी अपेक्षित तयारी याबाबत मार्गदर्शन केले.
या सोहळ्यात गुणवंत विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, शाखा, विविध स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांंचा यावेळी सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविक सचिव विकास देशमुख यांनी करताना रयत शिक्षण संस्थेच्या प्रगतीची महती विषद केली.
स्वागत मनोगत व्यक्त करताना चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी रयत शिक्षण संस्थेची ७५२ शाखातून ८ हजार वर्ग आता डिजिटल होणार असून शैक्षणिक प्रगतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक, कौशल्यपूर्ण, भविष्यात सामाजिक प्रगतीसाठी सर्वोत्तम योगदान देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे सांगितले.
यावेळी तब्बल ६६ पुरस्कार वितरण करण्यात आले.
सुत्रसंचलन डॉ. सविता मेनकुदळे, तर आभार सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे
कार्यक्रमास संस्थेचे माजी सचिव प्राचार्य डॉ.गणेश ठाकूर, डॉ. विठ्ठल शिवणकर, … यांच्यासह कर्मवीर कुटुंबीय, संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य,जनरल बॉडी सदस्य, स्थानिक शाखांचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी,रयत सेवक, कर्मवीर प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट –
प्रत्येक वर्गात इंटरॅक्टीव्ह पॅनेल
रयतेच्या प्रत्येक शाखेतील वर्ग खोल्यात इंटरॅक्टीव्ह पॅनेल बसवली जाणार आहेत. यातून लवकरच आधुनिक संगणक, अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून आनंदायी ई- लर्निंग दिले जाणार आहे. देशातील रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाखा डिजिटल अशी नवी ओळख लवकरच निर्माण होणार असल्याचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी सांगितले.