प्रतिनिधी : राजकीय क्षेत्रात अल्पावधीतच यशोशिखरावर पोहोचलेले नेतृत्व म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पक्षाचे सरचिटणीस प्रशांत यादव यांचा नामोल्लेख होतो. सामाजिक व राजकीय क्षेत्रात वावरत असतांना दृष्टी आणि दूरदृष्टी असणे महत्त्वाचे आहे. या दोन्ही बाबींसह नेता- उद्योजक होण्यासाठी लागणारे सर्व गुण प्रशांत यादव यांच्याकडे आहेत. शांत, संयमी, अभ्यासू नेतृत्व म्हणून अल्पावधीतच यादव यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार रमेश कदम, प्रदेश सरचिटणीस व रत्नागिरी जिल्हा निरीक्षक बबन कनावजे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुरेश बने आदींच्या पुढाकाराने काही महिन्यांपूर्वी प्रशांत यादव यांनी राजकारणातील ‘दैवत’ शरद पवार साहेबांना मानून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरचंद्र पवार पक्षात राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. याचवेळी पक्षाकडून चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघासाठी प्रशांत यादव यांच्या उमेदवारीचे संकेत देण्यात आले. महाराष्ट्राच्या राजकारणात असे पहिल्यांदाच पक्ष प्रवेशावेळी पक्षाकडून उमेदवारी घोषित होण्याचे भाग्य यादव यांना मिळाले. यातच प्रशांत यादव यांना राजकारणात मोठी संधी मिळण्याचे संकेत आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. यानंतर यादव यांचे चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य जनतेने उत्स्फूर्तपणे स्वागत केले. यानंतर अल्पावधीतच हा मतदारसंघ पिंजून काढत या मतदारसंघावर पकड मिळवली आहे. ‘चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचा विकास…रोजगार निर्मिती हाच आपला ध्यास’ आहे, अशी भावना प्रशांत यादव यांनी व्यक्त केली असून आता तर प्रशांत यादव यांना आशीर्वाद देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, देशाचे जाणते राजे खुद्द शरद पवार साहेब प्रशांत यादव यांना आशीर्वाद देण्यासाठी चिपळूण दौऱ्यावर येत आहेत. पवार साहेबांच्या या दौऱ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांच्या राजकीय वाटचालीचा घेतलेला थोडक्यात आढावा…
प्रशांत यादव हे एका सामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्व आहे. शिक्षणाने आर्किटेक्ट इंजिनिअर असलेले व बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करत त्यांनी आपल्या व्यवसायासह सामाजिक व राजकीय दृष्टीकोन ठेवून त्या क्षेत्रातदेखील आपली पाऊले उमटवली.
राजकीय पटलावर आपले नाव कोरले
प्रशांत यादव यांची राजकीय वाटचाल पाहता सुरुवातीच्या काळात खेर्डी ग्रामपंचायतच्या माध्यमातून राजकारणात पदार्पण केले. खेर्डी ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सरपंच यासारखी संविधानात्मक पदे भूषवून खेर्डी गावच्या विकासात मोठे योगदान दिले. याचवेळी यादव यांचे राजकीय क्षेत्रात नाव पटलावर आले. यानंतर यादव यांनी मागे वळून पाहिले नाही. काँग्रेसने त्यांच्यावर चिपळूण तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली. तब्बल पाच वर्ष (सन २०१८ ते सन २०२३ ) हे पद सांभाळताना काँग्रेस पक्ष तळागाळात रुजवण्यासाठी व भक्कम करण्यासाठी तालुक्यात प्रामाणिकपणे प्रयत्न केले. यातून यादव यांनी मोठा जनसंपर्क वाढवला. यामुळे ते खेडोपाड्यात पोहोचले. इतकेच नव्हे तर सामाजिक व राजकीय क्षेत्रात प्रशांत यादव यांचे नाव आदराने येऊ लागले. कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी केली आहे. या कार्यकर्त्यांना मानसन्मान दिला. शिवाय सर्वसामान्य लोक यादव यांच्याकडे गेल्यास त्यांचे समाधान केल्याशिवाय ते स्वस्थ बसत नाहीत. यातूनच यादव यांचे नाव राजकीय पटलावर अग्रक्रमाने येऊ लागले. या राजकीय वाटचालीत यादव यांना अनेकांचे मार्गदर्शन व भक्कम पाठबळ मिळाले. विशेष म्हणजे चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष व सासरे सुभाषराव चव्हाण, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, चिपळूण नागरीच्या संचालिका सौ. स्मिता चव्हाण, या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, सुविद्य पत्नी सौ. स्वप्ना यादव यांची खंबीर साथ मिळाली आहे.
वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाची रोवली मुहूर्तमेढ
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी कोकणातील शेतकऱ्यांना शेतीपूरक दुग्ध व्यवसायासाठी पाठबळ मिळाले पाहिजे, ही भावना जपली होती. तसेच ते नेहमीच आपल्या भाषणातून बोलून दाखवत असत. यातूनच साहेबांची प्रेरणा घेऊन कोकणातील शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सबळ करण्याच्या हेतूने यादव यांनी दुग्ध व्यवसायाचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. यासाठी महाराष्ट्रातील मोठ-मोठे दुग्ध प्रकल्प पाहिले. कोकणात दुग्ध व्यवसाय यशस्वी होत नाही, अशी नकारात्मक भावना होती. मात्र, या भावनेला छेद देण्याचा निर्णय घेत कोकणातील शेतकऱ्यांसाठी पूरक व्यवसायाचा पर्याय उभा करून त्यांना आर्थिक समृद्धी मिळवून द्यावी. इथल्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा हे स्वप्न उराशी बाळगून वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स या दुग्ध प्रकल्पाची ६ सप्टेंबर २०२१ रोजी चिपळूण पिंपळी खुर्द येथे मुहूर्तमेढ रोवली. या प्रकल्पाचे भूमिपूजन चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. नियोजनबद्ध कामामुळे अतिशय कमी कालावधीत आधुनिक दृष्ट्या वाशिष्ठी दुग्ध प्रकल्प अवघ्या दोन वर्षात उभा राहिला आणि या प्रकल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन तर राज्याचे उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते प्रत्यक्षपणे शानदार उद्घाटन झाले. यासाठी यादव यांच्या सुविद्य पत्नी व चिपळूण नागरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. हा प्रकल्प म्हणजे शेतकऱ्यांसाठी व सुशिक्षित तरुणांसाठी राजमार्ग ठरला आहे.
वाशिष्ठी डेअरीचे कृषी महोत्सव
कोकणातील शेतीपूरक दुग्ध व्यवसायासाठी वाशिष्ठी डेअरी प्रकल्प शेतकऱ्यांसाठी सुरू करून तसेच शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी. यासाठी वाशिष्ठी डेअरी प्रकल्पातर्फे ५ ते ७ जानेवारी २०२४ या दरम्यान कृषी महोत्सव आयोजित करण्यात आले होते. या कृषी महोत्सवात चिपळूण मधील १०० महिला बचतगटांसाठी मोफत स्टॉल्स देखील देण्यात आले होते. तर १ जुलै २०२४ रोजी कृषी प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनी कृषी मेळाव्याचे आयोजन करून या मेळाव्यात दापोली कृषी विद्यापीठातील तज्ञांनी भाजीपाला लागवडी संदर्भात सखोल मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांना भाजीपाला बियाणे व खत वाटप केले. यावेळी या कृषी मेळाव्यातून आम्हाला शेती प्रक्रियेसाठी दिशा मिळाली असल्याचे शेतकऱ्यांनी बोलून दाखवले. तर यावर्षी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाशिष्ठी डेअरी प्रकल्पातर्फे महिला बचतगटांसाठी महिला समृद्धी महोत्सव शहरातील कै. अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुलात आयोजित करून महिला बचतगट व महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतला. या महोत्सवाबद्दल महिलांनी प्रशांत यादव व सौ. स्वप्ना यादव यांना धन्यवाद दिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश
प्रशांत यादव यांचे वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाच्या माध्यमातून उद्योजक म्हणून नाव पुढे येत असतानाच महाराष्ट्रात झालेल्या राजकीय स्थित्यंतरे पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार रमेश कदम प्रदेश सरचिटणीस व जिल्हा निरीक्षक बबन कनावजे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुरेश उर्फ बारक्याशेठ बने आदींच्या पुढाकाराने यादव यांचा गेल्या काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरचंद्र पवार पक्षात शरद पवार साहेबांना ‘दैवत’ मानून प्रवेश झाला. पक्ष प्रवेशावेळीच पक्षाकडून यादव यांच्या उमेदवारीची घोषणा झाली. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात प्रथमच असे घडले असावे. यातून यादव यांचे राजकीय अस्तित्व सिद्ध होत आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
चिपळूण- संगमेश्वर मतदारसंघ काढला पिंजून
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात यादव यांनी प्रवेश केल्यानंतर ते चिपळूणमध्ये जेव्हा आले तेव्हा पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य जनतेने उत्स्फूर्तपणे स्वागत केले व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यानंतर यादव यांनी चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ पिंजून काढताना मतदारांच्या गाठीभेटी घेत गाव भेट दौरा करीत मतदारसंघावर पकड मिळवली. विशेष म्हणजे नुसती भाषणे न ठोकता येथील शेतकऱ्यांना दुग्ध व कृषी व्यवसायाच्या दृष्टीने मार्गदर्शन व्हावे, यासाठी शेतकरी मेळावे देखील घेतले. यातून रोजगार निर्मितीच्या प्रश्नाला यादव यांनी हात घातला आणि हाच विषय शेतकऱ्यांसह सुशिक्षित तरुणांना भावला आहे. नांगरणी व पालखी नृत्य स्पर्धा आयोजित करण्याबरोबरच वारकऱ्यांना टाळ वाटप, दहीहंडी पथक टी-शर्ट करून या सर्वांना प्रोत्साहित करण्याचे काम यादव यांनी केले आहे. विशेष म्हणजे वादळग्रस्तांना आर्थिक मदत देऊन मोठा दिलासा देण्याचे काम केले आहे.
मोफत अस्थि रुग्ण व रक्तदान शिबिरे
तत्पूर्वी प्रशांत यादव मित्र मंडळ व वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून मोफत अस्थि रुग्ण उपचार व रक्तदान शिबिर यासारखे शिबिर राबवून रुग्णांचा आधार दूर करण्यास हातभार लावला. यासारखे उपक्रम यापूर्वी कधीही झाले नाहीत. तसा कोणीही पुढाकार घेतल्याचे ऐकिवात नाही. या शिबिरातून यादव यांनी सामाजिक दायित्व सिद्ध केले आहे.
सहकार्याचा हात
पावसाळ्यात छोटे- छोटे व्यवसायिकांची मोठ्या छत्र्या नसल्यामुळे परवड होते. ही बाब लक्षात घेऊन प्रशांत यादव मित्र मंडळ व वाशिष्ठी डेअरी प्रकल्पातर्फे चिपळूण बाजारपेठेतील भाजीपाला व फळ विक्रेत्यांना छत्र्या वाटप करून या छोट्या व्यावसायिकांना मोठा दिलासा दिला. तसेच चिपळूण संगमेश्वर तालुक्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करून सहकार्याचा हात दिला आहे. याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातील गरजवंत महिलांना रेनकोटचे वितरण केले आहे. एकंदरीत प्रशांत यादव यांना परिस्थितीची जाणीव आहे.
शरद पवार साहेबांचा मिळणार आशीर्वाद
आता तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्राचे जाणते राजे शरद पवार चिपळूण दौऱ्यावर आले आणि या दौऱ्यात नागरिकांशी संवाद साधण्याबरोबरच प्रकल्पांना गाठीभेटी तसेच जाहीर सभा घेत या सभेतून पवार साहेब यांनी यादव यांना आशीर्वाद देत वाशिष्ठी मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट चे संस्थापक मा.प्रशांत बबन यादव यांच्यावर पवार साहेबांनी विश्वास दाखवून उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची जाहीर घोषणा केली आहे.यादव यांनी संगमेश्वर चिपळूण येथील शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी श्वेत क्रांतीचे स्वप्न दाखवले.ओस पडलेले गोठे दुभत्या जनावरांनी पुन्हा भरू लागले आहेत. युवक, महिला, पुरुष शेतकरी हा सुखद अनुभव अनुभवत आहेत.ही सभा राजकीय नेते,कार्यकर्ते, विरोधक सगळ्यांची उत्कंठा वाढवीत आहे.उमेदवार म्हणून नाव घोषित होताच ही बाब यादवांसाठी आनंदाची ठरली.एकंदरीत प्रशांत यादव यांची राजकीय वाटचाल वृद्धिंगत होणार असून यादव यांच्या राजकीय वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!
लेखन -संतोष सावर्डेकर( चिपळूण)
संकलन – शांताराम गुडेकर (मुंबई )