मुंबई : फूटपाथवर बसून जनतेच्या पायताणाची काळजी घेणारा चर्मकार समाज आज अनेक वर्षापासून आपल्या न्याय हक्कासाठी सरकारकडे पाठपुरावा करत आहे. मात्र सरकार फसव्या घोषणा व आश्वासन देण्यात गुंग झाले आहे. त्यामुळे आता हा समाज आझाद मैदानात सरकारच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी मंत्री बबनराव घोलप यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
चर्मोद्योग हा परकीय चलन मिळवून देणारा व्यवसाय आहे. मात्र या व्यवसायाकडे सरकारचे लक्ष नाही. चर्मकार समाजाचे महामंडळ आहे. त्याला अध्यक्ष नाही. पुरेसे कर्मचारी महामंडळात नाहीत. असे प्रदेशाध्यक्ष माधव गायकवाड यांनी सांगितले. फंड नसल्याने अनेक चर्मकार बांधव अनुदान व कर्ज यापासून वंचित आहेत. तरुण बेरोजगार झाले आहेत.यासाठी मंगळवार दि १ ऑक्टोबर २०२४ रोजी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुंबईतील आझाद मैदान येथे तीव्र आंदोलन उभारणार असल्याचे मुंबई अध्यक्ष राजू नेटके यांनी यावेळी सांगितले.
लाडकी बहिण व लाडका भाऊ या योजना मतांच्या जोगव्यासाठी आहेत हे सरकारलाही माहीत आहे. तरीही सरकार मनमानी कारभार करत आपलेच खरे करत आहे. त्यामुळे आता मागण्या मान्य होईपर्यंत मैदान सोडायचे नाही असा इशारा समाजाचे युवा नेते जगदीश लाड यांनी दिला आहे.